‘नो मोअर पेव्हर’
By admin | Published: January 7, 2016 02:20 AM2016-01-07T02:20:46+5:302016-01-07T02:20:46+5:30
‘पेव्हर’चे ‘फिव्हर’ महापालिकेच्या डोक्यावरून अखेर उतरले आहे़ त्यामुळेच पालिकेने तयार केलेल्या नव्या नियमावलीत ‘पेव्हर ब्लॉक’ लावणे बंद करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे़
मुंबई: ‘पेव्हर’चे ‘फिव्हर’ महापालिकेच्या डोक्यावरून अखेर उतरले आहे़ त्यामुळेच पालिकेने तयार केलेल्या नव्या नियमावलीत ‘पेव्हर ब्लॉक’ लावणे बंद करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे़ त्यानुसार जुने ‘पेव्हरब्लॉक’ही उखडून काढण्यात येणार आहेत़ या बाबतच्या नवीन धोरणाचा मसुदा गटनेत्यांच्या बैठकीपुढे मांडण्यात आला आहे़
मुंबईत १९४९ कि़मी़ रस्त्याचे जाळे आहे़ या रस्त्यांच्या डागडुजीसाठी मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये मोठा वाटा राखून ठेवण्यात येतो़ मात्र, रस्त्याची अवस्था जैसे थेच आहे़ रस्त्याची ही दुरवस्था मिटवण्यासाठी २० वर्षांपूर्वी पालिकेने ‘पेव्हर ब्लॉक’ बसविण्याचा निर्णय घेतला होता़ हे ‘पेव्हर ब्लॉक’ कुठे बसवावे, याची एक नियमावलीच तयार करण्यात आली होती़
मात्र, हे नियम धाब्यावर बसवून पदपथ, रस्ते, सिग्नल, चौक अशा सर्वच ठिकाणी ‘पेव्हर ब्लॉक’ बसविण्यात आले़ या ‘पेव्हर ब्लॉक’चा दर्जा निकृष्ट असल्याने, चांगल्या रस्त्यांची आणखी दुरवस्था झाली़ यामुळे मुंबईचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात गेले़ पालिकेच्या तिजोरीला लुटणाऱ्या या ‘पेव्हर ब्लॉक’वर निर्बंध आणण्यासाठी आयुक्त अजय मेहता यांनी नवीन नियम आणले आहेत़ (प्रतिनिधी)