महापालिका शाळा नाही, आता मुंबई पब्लिक स्कूल; प्रवेश प्रक्रिया लवकचर होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 02:13 AM2020-02-06T02:13:47+5:302020-02-06T06:21:08+5:30
मुंबई : महानगरपालिकेमार्फत सुरू होत असलेला मुंबई पब्लिक स्कूल हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार ...
मुंबई : महानगरपालिकेमार्फत सुरू होत असलेला मुंबई पब्लिक स्कूल हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबई पब्लिक स्कूलच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात झाले, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी पालिकेकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, पालकांचा कल मात्र इंग्रजी माध्यमाकडे असल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. विद्यार्थ्यांची घट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई पब्लिक स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. या शाळांची संख्या सध्या ६८ असून, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर आता पालिकेच्या इतर शाळांचा कायापालट करण्यासाठी पालिका शाळा आता मुंबई पब्लिक स्कूल या बॅनरखाली कार्यरत राहणार आहेत. या शाळांसाठी आता पालिकेच्या बोधचिन्हाऐवजी नवीन बोधचिन्हाचे वापर केला जाणार आहे. यामुळे निश्चितच पालिका शाळा इतर शाळांच्या स्पर्धेत स्वत:ची वेगळी ओळख घेऊन उतरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सोबतच महापालिकेशी संलग्न वुलन मिल्स, माहिम येथील पहिली आयसीएसई बोर्डाची पूनमनगर येथे सीबीएसई-संलग्न बोर्डाच्या शाळेची घोषणा मुंबई पब्लिक स्कूलच्या बॅनरखाली चालविल्या जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या शालनातील प्रवेश प्रक्रिया ही फेब्रुवारीमध्ये सुरू होणार असल्याची माहिती सहआयुक्त (शिक्षण) आशुतोष सलील यांनी दिली. या शाळांसाठी प्रवेश मर्यादा निश्चित केली जाईल. प्रत्येकासाठी या शाळांतील प्रवेश सुरू राहणार असले, तरी प्रवेश प्रक्रियेसाठी सोडत प्रक्रिया राबविण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भातील नियम अद्याप अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यासंबंधी अधिकृत सूचना देण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मराठी भाषा प्रत्येकाला ज्ञात असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने त्याचे ज्ञानही गरजेचे आहे. यासाठी तयार करण्यात आलेले बोधचिन्हदेखील उत्कृष्ट आणि अर्थपूर्ण असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या माध्यमातून शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, विविध महनीय व्यक्तींच्या सहकार्याने ‘चला वाचू या’ हा उपक्रम राबविणे, यासह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमांवरही भर देण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.