Join us

उपयोगात नसणाऱ्या महाविद्यालयीन सुविधांचा भार शुल्करूपात नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:06 AM

युवा सेनेची प्राधिकरणाकडे मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उपयोगात नसणाऱ्या महाविद्यालयीन सुविधांचा भार शुल्करूपात नको, अशी मागणी युवा ...

युवा सेनेची प्राधिकरणाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उपयोगात नसणाऱ्या महाविद्यालयीन सुविधांचा भार शुल्करूपात नको, अशी मागणी युवा सेनेने विद्यार्थी, पालकांच्यावतीने शुल्क नियामक प्राधिकरणाकडे केली आहे.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पालकांना असंख्य आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, जीमखाना, ग्रंथालये, संगणक कक्ष, खेळ व तत्सम सुविधांचा उपयोग विद्यार्थ्यांना होत नसतानाही या सुविधांचे शुल्क महाविद्यालयांकडून आकारले जात असल्याच्या तक्रारी पालक, विद्यार्थ्यांकडून सातत्याने येत आहेत. याची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकतेच सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांचे शुल्क नियामक प्राधिकरण स्थापन केले आहे. या प्राधिकरणामुळे यंदा सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्याही वरिष्ठ महाविद्यालयांना मनमानी शुल्‍क वसुली करता येणार नाही. गतवर्षी राज्यातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाही बहुतांश महाविद्यालयांनी मोठ्या प्रमाणात इतर शुल्क वसूल केले होते, त्यालाही चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कोरोना काळात महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयात ज्या सुविधांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपयोग होत नाही, अशा सुविधांची शुल्क आकारणी न करण्याबाबतचे निवेदन युवा सेना शिष्टमंडळाने शुल्क नियामक प्राधिकरण समितीचे विद्यमान नवनिर्वाचित सदस्य ॲड. धर्मेंद्र मिश्रा यांची भेट घेऊन त्यांना दिले. तसेच एकाचवेळी वार्षिक शुल्क अदा करणे शक्य होत नसेल, अशा विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शुल्क अदा करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेले प्राधिकरण विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारे ठरेल, अशी अपेक्षा युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी व्यक्त केली.

..................................................