बाळासाहेबांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको; उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 06:50 IST2025-01-11T06:49:32+5:302025-01-11T06:50:07+5:30
शिवाजीपार्क येथील जुन्या महापौर बंगल्याच्या परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम करण्यात येत आहे

बाळासाहेबांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको; उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्याचे काम दि. २३ जानेवारी २०२६ या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाआधी पूर्ण करून उद्घाटन करण्याचा प्रयत्न असेल. मात्र, स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको, त्यापेक्षा बाळासाहेबांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे, असे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शिवाजीपार्क येथील जुन्या महापौर बंगल्याच्या परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याची माहिती ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उद्धवसेनेचे नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. समुद्राशेजारील महापौर बंगला हा हेरिटेज वास्तू आहे. त्याच्या मूळ रचनेला धक्का न लावता स्मारक बांधण्याचे काम आव्हानात्मक होते. पण, आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांनी योग्य ती खबरदारी घेऊन हे काम पूर्ण केले. समुद्राचे खारे पाणी किंवा वादळ, जोरदार वारा यांचा विचार करून बंगल्यात भूमिगत पद्धतीने बाळासाहेबांच्या स्मारकाची उभारणी केली आहे. महापौर बंगला हा नुसती वास्तू नाही, तर भावनात्मक बंधन आहे, असे ठाकरे म्हणाले.
पुतळा उभारणे म्हणजे स्मारक नाही
शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र लिहिले नाही, कारण त्यांचे आयुष्य उघडे पुस्तक होते. त्यामुळे स्मारकामध्ये त्यांचा पुतळा असेल किंवा नसेल. पण, त्यांनी समाजाला जे काही दिले त्याचे प्रतिबिंब स्मारकामध्ये दिसेल. त्यांचा संपूर्ण जीवनपट येथे दाखविला जाणार आहे. त्यांच्या आठवणी कोणाकडे असतील, तर त्यांनी सेनाभवनमध्ये यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जे सरकार असेल त्याचे श्रेय...
२०२२ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन केले. मात्र, त्यानंतर सरकार बदलले. आता २०२६ मध्ये काम पूर्ण होऊन उद्घाटनावेळी जे सरकार असेल त्याचे ते श्रेय असेल. त्यावेळी जे पंतप्रधान असतील त्यांना आमंत्रित करू. तसेच एनडीए शिल्लक राहिली तर त्यांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाईल. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचा आराखडा पूर्ण केला आहे. बाळासाहेब यांचा पूर्ण जीवनपट उलगडला जाणार आहे. त्यांची भाषणे, व्यंगचित्रे, गाजविलेल्या सभा, त्यांच्या वस्तू, दुर्मिळ फोटो, वाचनालय अशी सर्व माहिती तेथे असेल. काही बारकावे अजूनही बाकी आहेत. काही वस्तू कशा पद्धतीने मांडायच्या यावर काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.