Join us

Mumbai Lockdown: मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, पण...; महापालिका आयुक्तांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 5:59 PM

Mumbai Lockdown: मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल (iqbal singh chahal) यांनी मुंबईकरांवर सध्या लॉकडाऊन लादण्याची गरज नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. यात विदर्भात कोरोना रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट सर्वाधिक असल्याचं दिसून आलं आहे. तर मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्येही रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा लॉकडाऊनची Mumbai Lockdown शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल Iqbal Singh Chahal यांनी मुंबईकरांवर सध्या लॉकडाऊन लादण्याची गरज नसल्याचं वक्तव्य केलं आहे. चहल यांच्या विधानामुळे मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. (No Need For Lockdown in Mumbai says Iqbal Singh Chahal)

"मुंबईकरांवर सध्या थेट लॉकडाऊन लादण्याची गरज वाटत नाही. पण मुंबईकरांनी अतिशय गांभीर्यानं कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळायला हवेत. ते जर नाही पाळले तर भविष्यात कठोर निर्बंध लादण्याची गरज भासेल", अशा इशारा पालिका आयुक्त इक्लाबलसिंग चहल यांनी दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

मुंबईत कोरोना रुग्णांची संध्या वाढते आहे. पण त्याचबरोबर शहरात कोविड चाचण्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढविण्यात येत आहे. मुंबईत काल एका दिवसात २३ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या. याआधी जानेवारीत १० ते १२ हजार चाचण्या होत होत्या, अशी माहिती चहल यांनी दिली. राज्यात इतर ठिकाणचा पॉझिटिव्हीटी रेट मुंबईपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जाऊ शकतो. पण मुंबईत सध्या तशी स्थिती नाही, असं चहल यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

पालकमंत्र्यांनी दिले अंशत: लॉकडाऊनचे संकेतमुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मात्र मुंबईकरांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं नाही आणि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर अंशत: लॉकडाऊन करावं लागेल, असा इशारा याआधीच दिला आहे. त्यासाठी मुंबईत सर्वात आधी नाइट क्लब बंद करण्याचा विचार सुरू असल्याचंही ते म्हणाले. त्याशिवाय रात्रीची संचारबंदी, गर्दीची ठिकाणं, बाजारपेठा, लग्नसमारंभ यावर कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका