काही गरज नाही राज-उद्धव यांनी एकत्र यायची; मनसे नेत्याची 'खळ्ळ-खटॅक' चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 01:36 PM2019-11-25T13:36:58+5:302019-11-25T13:45:54+5:30

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही युतीचं सरकार स्थापन करता आलं नाही.

No need for Raj-Uddhav to come together; MNS leader's angry | काही गरज नाही राज-उद्धव यांनी एकत्र यायची; मनसे नेत्याची 'खळ्ळ-खटॅक' चपराक

काही गरज नाही राज-उद्धव यांनी एकत्र यायची; मनसे नेत्याची 'खळ्ळ-खटॅक' चपराक

Next

मुंबईः विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही युतीचं सरकार स्थापन करता आलं नाही. त्याऐवजी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीला जवळ करून सरकार स्थापण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहिल्यानंतर भाजपानं त्यांच्या प्रयत्नांनाच सुरुंग लावला. भाजपानं शरद पवारांचे पुतणे असलेल्या अजित पवारांना गळाला लावून भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं, त्यामुळे राज्याच्या राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली. उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत असलेली युती तोडल्यानंतर शिवसेना एनडीएतूनही बाहेर पडली आणि शिवसेनेनं भाजपाशी सगळीच नाती तोडली.

शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीनं मुख्यमंत्रिपद मिळेल ही आशा होती, परंतु तीसुद्धा फोल ठरताना दिसत आहे. कधी नव्हे ते उद्धव ठाकरेंनी स्वतःहून पुढाकार घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा केली होती. तसेच तिन्ही पक्षांचं किमान समान कार्यक्रमावर एकमत झालेलं होतं. सत्तेतील वाटप अन् अधिकारपदांच्या निर्णयाचा प्रश्न सोडवण्यावर तोडगा काढल्याचं बोललं जातं होतं. परंतु ऐनवेळी अजित पवारांनी दगा दिल्यानं शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सरकार स्थापण्याचे मनसुबे पुरते धुळीला मिळाले आहेत. भाजपाबरोबर संबंध कमालीचे ताणल्यानंतर आता शिवसेनेनं मनसेबरोबर युती करावी, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


शिवसेना आणि मनसेच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं, असं खासगीत म्हटलं आहे. तोच धागा पकडत मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अशी चर्चा करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. अमेय खोपकर फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, शिवसेनेला जरा कुठे राजकारणात त्रास झाला की आपले महाराष्ट्र सैनिक चालू होतात, 'आता मराठी माणसासाठी दोन्ही भावांना एकत्र यायला हवे...' काही गरज नाही... त्यासाठी राजसाहेब एकटे समर्थ आहेत, राजसाहेबांनी आतापर्यंत कितींदा राजकारणात त्रास झाला... तेव्हा कुठे गेला होता हा भाऊ ??, असा प्रश्नच अमेय खोपकरांनी उपस्थित केला आहे. 
मुंबई महापालिकेत मनसेचे फक्त 7 नगरसेवक निवडून आले होते. तेव्हा स्वत:च्या भावाचे 6 नगरसेवक चोरले. तेव्हा का विचार नाही केला की माझ्याकडे खूप काही आहे पण भावाकडे काहीच नाही. कसे घेऊ त्याचे नगरसेवक. तेव्हा कुठे गेलं बंधुत्व???, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. 

मला वाटते अशा खूप गोष्टी सांगण्यासारखा आहेत, पण त्या आता महत्त्वाच्या नाहीत. आपला पक्ष कसा वाढेल त्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. आणि राहिला दोन्ही भावांचा एकत्र येण्याचा प्रश्न ते दोन्ही भावांना ठरवू द्या. पण सध्या तरी असं काही होणार नाही आणि अपेक्षा पण करू नका. बाकी महाराष्ट्र सैनिक हा खूप भावनिक आहे हे कळते. पण त्याने पक्ष वाढणार नाही हे देखील तितकेच सत्य आहे. सर्वच पक्ष नीच राजकारण करत आहेत आणि त्याचा फायदा मनसेला कसा होईल त्यावर लक्ष केंद्रित करायची जास्त गरज आहे. उगाच स्वत:ही भावनिक होऊन इतरांनाही भावनिक करत बसू नका, असा सल्लाही त्यांनी मनसैनिकांना दिला आहे.
 

Web Title: No need for Raj-Uddhav to come together; MNS leader's angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.