प्रतिपिंड कमी झाल्याने नवी लाट निष्कर्षासाठी घाई नको, वैद्यकीय तज्ज्ञांचा निर्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:06 AM2021-04-27T04:06:49+5:302021-04-27T04:06:49+5:30
शरीरातील प्रतिपिंड कमी झाल्याने संसर्गाचा विळख्याविषयी संभ्रम दिल्लीतील संस्थेच्या अहवालातील निरीक्षण प्रतिपिंड कमी झाल्याने नवी लाट या निष्कर्षासाठी घाई ...
शरीरातील प्रतिपिंड कमी झाल्याने संसर्गाचा विळख्याविषयी संभ्रम
दिल्लीतील संस्थेच्या अहवालातील निरीक्षण
प्रतिपिंड कमी झाल्याने नवी लाट या निष्कर्षासाठी घाई नको
वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरातील प्रतिपिंडाची क्षमता कमी झाल्याने संसर्गाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून त्यातून नव्या लाटेचा धोका उद्भवल्याचे निरीक्षण दिल्लीतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंटिग्रेटेड बायोलॉजी’ने (आयजीआयबी) संस्थेने मांडले आहे. परंतु, याविषयी अंतिम अहवालाची प्रतीक्षा असल्याने त्वरित निष्कर्षावर येऊ नये असे वैद्यकीय तज्ज्ञांनी मत मांडले.
या अहवालात १७ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील १० हजार ४२७ व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. त्यात सीएसआयआरच्या ४० प्रयोगशाळांमधील कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरामध्ये प्रतिपिंडे तयार होतात. अहवालानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणाऱ्या ‘न्यूट्रलायझिंग प्रतिपिंड’ अनेक लोकांमध्ये गेल्या सहा महिन्यांत कमी झाल्यामुळे पुन्हा संसर्ग होऊ लागला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देशात रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला. परंतु ऑक्टोबरमध्ये नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होऊ लागले होते. आता त्यात प्रतिपिंडांच्या अभावामुळे पुन्हा वाढ होऊ लागली आहे, त्यातून हा उद्रेक होत असल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले.
याविषयी, टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, या अहवालात अभ्यास केलेल्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णांच्या तुलनेत अत्यल्प आहे. शिवाय, यापूर्वीही वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनामुक्तीनंतर पुन्हा संसर्गाचा धोका असल्याचे निरीक्षण मांडले आहे. अशी काही प्रकरणेही राज्यासह सर्वत्र दिसून आली. त्यामुळे आता कोरोनामुक्तीच्या दिशेने जाण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया गतीने राबविण्याची गरज आहे. लस घेतल्यानंतर प्रत्येकाला सुरक्षित कवच मिळत असून संसर्गाचा धोकाही कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
बाधा झाल्यानंतर शरीरात तयार झालेल्या ‘टी सेल’ही रोगप्रतिकारक शक्तीप्रमाणे कार्यरत असतात. त्यामुळे प्रतिपिंडांचे प्रमाण कमी झाल्याने या शक्तीवर काही परिणाम होतो आहे का, हे अधिक संशोधन झाल्यास ठोसपणे सांगता येईल. त्याचप्रमाणे, कोरोनाच्या नव्या लाटेसाठी शरीरातील प्रतिपिंड कमी होणे हे कारण असल्याची घाई करणे चुकीचे आहे. राज्यात डबल म्युटंटचा प्रादुर्भाव झपाट्याने होत होता, तसेच संसर्ग पसरण्याची गतीही अधिक असल्याने रुग्णसंख्येचा आलेख चढता राहिला आहे, अशी माहिती विषाणूतज्ज्ञ डॉ. उल्हास पटियाल यांनी दिली.
* प्रतिपिंडाचा कालावधी सहा महिन्यांसाठी, फेरसंसर्गाचे प्रमाण अत्यल्प
दिल्लीतील या संस्थेचा अहवाल राज्याच्या दृष्टीने संयुक्तिक नाही. तसेच, या अहवालातील सहभागी रुग्णांची संख्या बाधितांच्या तुलनेत अत्यल्प आहे. प्रतिपिंडाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असल्याने संसर्गाचा धोका कायम असतोच. त्यामुळे मागील मार्चमध्ये बाधा झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो. मात्र एकूणच देश, राज्याच्या तुलनेत फेरसंसर्गाचे प्रमाण अगदी तुरळक आहे. प्रतिपिंडाच्या अभावामुळे नव्या लाटेचा धोका आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. त्यासाठी सातत्याने विविध पातळ्यांवर संशोधन करणे गरजेचे आहे.
- डॉ. अविनाश सुपे, राज्य कोरोना टास्क फोर्स
............................