मुंबई - सुमारे १२ दिवस चाललेल्या तिढ्यानंतर अखेर आता राज्यात भाजपा आणि शिवसेना महायुतीमधील तणाव आता काहीसा निवळताना दिसत आहे. एकीकडे भाजपा नेत्यांनी कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होईल, असे सांगत शिवसेनेशी चर्चेस तयार असल्याचे संकेत दिले आहे. तसेच शिवसेनेने योग्य प्रस्ताव द्यावा, असेही भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, युतीची चर्चा होत असताना जे ठरलं होतं त्याप्रमाणे करा, वेगळा प्रस्ताव देण्याची गरज आम्हाला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर मुनगंटीवार यांनी सरकार स्थापनेबाबत कुठल्याही क्षणी गोड बातमी येणार असल्याचे सांगितले. तसेच अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतही आम्ही चर्चेस तयार आहोत, असे मुनगंटीवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ''१२ दिवसांनंतर भाजपाकडून काही सकारात्मक आणि समंजसपणाचे निवेदन आले आहे. माझ्या मते भाजपाला वेगळा प्रस्ताव देण्याची गरज नाही. युतीची चर्चा होत असताना जे ठरलं होतं त्याप्रमाणे करा, वेगळा प्रस्ताव दिला पाहिजे, असे वाटत नाही. जे ठरलं आहे त्याप्रमाणे करा एवढाच आमचा एका ओळीचा प्रस्ताव आहे.'' दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये, अशी आमची भूमिका आहे. राष्ट्रपती राजवट लागली तर तो जनतेचा अपमान ठरेल. राज्यात चांगलं सरकार यावं, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षाही संजय राऊत यांनी व्यक्त केली.
जे ठरलंय त्याप्रमाणे करा, वेगळ्या प्रस्तावाची गरज नाही - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 6:05 PM