मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले आणि हा खटला नियमित चालविण्याचे निर्देश कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले.
या प्रकरणातील फरार आरोपींचा ठावठिकाणा तपासयंत्रणा शोधत आहे. न्यायालयाने तपासावर देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही. मात्र, न्यायालयात करण्यात आलेला युक्तिवाद विचारात घेता आम्ही खटला नियमित चालविण्याचे निर्देश देतो, असे नमूद करीत न्या. अजय गडकरी व न्या. कमल खटा यांच्या खंडपीठाने पानसरे यांची मुलगी आणि सुनेने दाखल केलेली याचिका निकाली काढली.
पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट असल्याने हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही, असे निदर्शनास आणीत पानसरे कुुटुंबीयांनी या तपासावर न्यायालयाने देखरेख ठेवावी, यासाठी याचिका दाखल केली होती. एसआयटी, एटीएसने यामध्ये ‘सनातन संस्थेची’ भूमिका विचारात घेऊन तपास केला नसल्याचा आरोपही पानसरे यांच्या कुुटुंबीयांनी केला. मात्र, या याचिकेवर आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळस्कर यांनी आक्षेप घेतला. खटला सुरू झाल्याने तपासावर देखभाल ठेवण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
फरार आरोपी अजूनही मोकाटचकॉ. पानसरे यांची हत्या फेब्रुवारी २०१५ मध्ये करण्यात आली. या गुन्ह्यातील फरार आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना अटक करण्यात तपास यंत्रणांना यश आले नाही. डॉ. वीरेंद्र तावडे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, तर समीर गायकवाड, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, अमित दिग्वेकर, शरद कळस्कर, भारत कुरणे हे आरोपी आहेत.