आता ५.४६ पर्यंत थांबायची गरज नाही; उद्यापासून पहिली फास्ट लोकल ४.३५ ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 09:02 AM2023-08-09T09:02:43+5:302023-08-09T09:02:50+5:30
सीएसएमटीवरून पहाटे ४.१९ ला पहिली कसारा लोकल सुटते. त्यानंतर खोपोली लोकल ४.२४ ला रवाना होते तिलाच जलदमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रात्री जिवाची मुंबई केल्यावर पहाटे घरी परतणाऱ्या प्रवाशांना तसेच रात्रपाळीत काम करणाऱ्या नोकरदारांना लवकर घरी पोहचता यावे, यासाठी गुरुवार, १० ऑगस्टपासून मध्य रेल्वेने जलद लोकलच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) पहिली जलद लोकल पहाटे ४.३५ ला सुटणार आहे. जलद लोकल खोपोलीपर्यंत धावणार आहे. सद्यस्थितीत पहिली जलद लोकल पहाटे ५.२०ची असते. मात्र, ती एसी असल्याने अनेकांना पावणेसहापर्यंत ताटकळावे लागते.
सीएसएमटीवरून पहाटे ४.१९ ला पहिली कसारा लोकल सुटते. त्यानंतर खोपोली लोकल ४.२४ ला रवाना होते तिलाच जलदमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. साध्या जलद लोकलसाठी ५.४६ पर्यंत वाट पहावी लागते. त्यामुळे थकल्याभागल्यांना घर गाठण्यासाठी वेळ लागतो. नव्या लोकलमुळे प्रवाशांची ही अडचण दूर होईल.
११ मिनिटांची बचत
पहाटे ४.२४ ची सीएसएमटी ते खोपोली धीमी लोकल आता ४.३५ ला जलद लोकल म्हणून चालवण्यात येणार आहे. ही लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकावर थांबेल. कल्याण ते खोपोली दरम्यान सर्व स्थानकावर लोकल थांबणार आहे. जलद लोकलमुळे प्रवासात ११ मिनिटांची बचत होणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.