लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशावर नव्या कोरोनाचे सावट आहे. ब्रिटनहून आलेल्या वीस जणांना त्याची लागण झाली आहे. मात्र, राज्यात अद्याप या नव्या कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली.
ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वप्रथम महाराष्ट्राने घेतला. परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. देश आणि राज्यात योग्य ती काळजी घेतली जात आहे. ब्रिटनहून महाराष्ट्रात आलेल्या ४३ प्रवाशांचे नमुने तपासले आहेत, त्यात नवा कोरोना आढळला नाही. तसेच ब्रिटनमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची योग्य तपासणी केली जात आहे. चाचणीय प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरही त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.
ब्रिटनमधील नव्या कोरोनाकडे राज्य सरकार गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करत आहे. पण काही प्रवासी गायब असतील तर राज्य सरकार योग्य ती पावले उचलेल, असे आश्वासनही आरोग्य मंत्र्यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारीपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्याचा निर्णयही जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
.........................................