मुंबई : बोरिवली पश्चिम महात्मा फुले नगर येथील ९१ झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळाले असून, त्यामुळे त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत. उत्तर मुंबईत एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये, तसेच अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जावी, असे निर्देश केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिले.
बोरिवली पश्चिमेकडील पालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयात महात्मा फुले नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या झोपडपट्टीधारकांना सदनिकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पियुष गोयल बोलत होते.
याप्रसंगी स्यानिक आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी,परिमंडळ ७च्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसेआर/मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, झोन ७च्या अधिकारी भाग्यश्री कापसे यांच्यासह स् माजी नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
झोपडपट्टी पुनर्वसनाला गती देणार
केंद्रीय पियुष गोयल म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलांचे संगोपन पक्क्या घरात करायचे असते. त्यामुळे पात्र झोपडपट्टीधारकांना त्याच परिसरात घरे मिळाली पाहिजेत. झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया गतीमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. तसेच, बाहेरचा कोणी या भागात येणार नाही आणि इथल्या रहिवाशांना अन्यायाने बाहेर फेकले जाणार नाही, याची खबरदारी घ्या, असे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना दिले.
अनधिकृत झोपड्या आणि फेरीवाल्यांवर कारवाईचा इशारा
उत्तर मुंबईत नवीन झोपड्या उभ्या राहणार नाहीत. अधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी, अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. ग्रीनरी आणि सार्वजनिक सौंदर्यस्थळे नीट राखा. सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवा आणि बागांमध्ये गैरवर्तन होणार नाही, याची जबाबदारी घ्या. अधिकृत फेरीवाल्यांना संधी द्या, मात्र अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करा," असेही निर्देश गोयल यांनी दिले.
माझ्या नावाचा वशिला लावू नका!
माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचे काम करण्यास सांगत असेल, तर त्याला स्पष्ट नकार द्या. अशा व्यक्तींची तक्रार थेट लोककल्याण कार्यालयात करा,असेही आवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नागरिकांना केले.