‘इमारतीची नोंद नसल्याने नोटीस बजावली नव्हती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:10 AM2019-07-17T06:10:21+5:302019-07-17T06:10:46+5:30
डोंगरी येथील ज्या इमारतीची दुर्घटना घडली ती इमारत अनधिकृत असल्यामुळे तिचा धोकादायक इमारतीच्या यादीमध्ये समावेश नव्हता असे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मुंबई : डोंगरी येथील ज्या इमारतीची दुर्घटना घडली ती इमारत अनधिकृत असल्यामुळे तिचा धोकादायक इमारतीच्या यादीमध्ये समावेश नव्हता असे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, इमारत दुर्घटना घडली त्याच्या शेजारील इमारतीला नोटीस बजावण्यात आली होती. परंतु ही इमारत अनधिकृत असल्यामुळे त्याची नोंद नव्हती त्यामुळे त्या इमारतीला नोटीस बजावली नाही. म्हाडाच्या सेस इमारती शेजारी ही इमारत उभी राहिली होती. म्हाडा उपाध्यक्ष यांच्याकडे माहिती मागविण्यात आली असून त्यांनतर जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मुंबईत एकूण १९ हजार सेस इमारती आहेत. या जुन्या इमारतींचे मूळ मालक पुढे येत नाही. मुंबई बाहेर पुनर्वसनाला भाडेकरू तयार होत नाही. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टकडे ४५० सेस इमारती आहेत त्या दुरुस्त करण्याच्या आवश्यकता आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा भाड्याने दिल्यास आम्ही तेथे पुनर्वसन करू याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवणार आहे, असे विखे यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत उद्या जाहीर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.