श्रीकांत जाधव
मुंबई : शाळेला ओसी प्रमाणपत्र नसतानाही शाळा भरवणे, वर्ग खोल्या रिक्त असताना विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नसणे, अधिकच गरज असतानाही शिक्षक उपलब्ध नसणे, अशा अनेक कारणांनी वांद्रे येथील महापालिका ‘एच’ प्रभागातील ६ वॉर्डातील शाळांमध्ये समस्यांचे आगार झाले आहेत. वारंवार अर्ज, निवेदने देऊनही पालिका शिक्षण खात्याकडून त्याची योग्य दखल घेतली जात नाही. अनेक शाळांमध्ये प्रचंड प्रमाणात सोयीसुविधांची वानवा आहे. तरीही पालिका शिक्षण खाते या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मेहमूद देशमुख आहे.
भारतनगर पालिका शाळेला फायरची मान्यता नसल्याने ओसी मिळालेली नाही. काम पूर्ण झाल्यावर ती मिळेल. जवाहर शाळेतील विद्यार्थ्यांचे योग्य नियोजन झाले आहे. शाळांचे अनेक प्रश्न विभागाकडून पत्रव्यवहार करून मार्गी लागले आहेत. शिक्षक भरतीचा पाठपुरावा सुरू आहे. - अश्फाक शेख, प्रभारी प्रशासकीय अधिकारी, पालिका ‘एच’ पूर्व प्रभाग
वांद्रे येथे अनधिकृत पार्किंगमुळे जीव धोक्यात !
भर रस्त्यात दिवस-रात्र अनधिकृतपणे दुतर्फा वाहने पार्किंग केली जात असल्याने वांद्रे येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या वाहनकोंडीमुळे शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून येथे वावरावे लागत आहे.वांद्रे पूर्व सरकारी वसतिगृहासमोर इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश आणि हर्णे गुरुजी विद्यालय अशा शाळा आहेत. या शाळेत सर्वाधिक विद्यार्थी आहेत. त्यामुळे शाळेच्या वेळेत येथे विद्यार्थी, पालकांची गर्दी असते; मात्र जेथे शाळेचे प्रवेशद्वार आहेत तेथे एकच रस्ता आहे. या रस्त्यात काही महिन्यांपासून अनधिकृतपणे दुतर्फा वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे शाळा परिसरात रस्त्यावर चालणेसुद्धा विद्यार्थ्यांना कठीण झाले आहे.
शाळा - समस्यांचे आगार वॉर्ड क्र. ८७ : गोळीबार मनपा उर्दू शाळा : ८ वर्ग खोल्या आहेत. ६ शिक्षकच शिकवत आहेत. त्यात शिक्षक गैरहजर किंवा इतर कामात गुंतल्यास संपूर्ण शाळा तीन लोकांवर असते. वॉर्ड क्र. ९२ : भारतनगर पालिका शाळा : मजले चार आहेत. त्यापैकी २ मजल्यांच्या बांधकामास ओसी प्रमाणपत्र नाही. तरीही या मजल्यांच्या वापर केला जात आहे. हिंदी शाळा वाल्मिकीनगर शाळा परिसरात अनधिकृत पार्किंग केली जात असल्याने विद्यार्थ्यांना वाहनकोंडीच्या प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वॉर्ड क्र. ९३ : शासकीय वसाहत रामकृष्ण परमहंस मार्ग शाळा : मराठी माध्यमाच्या १० वर्ग खोल्या रिक्त आहेत. खोल्यांचा वापर होत नाही. सार्वजनिक बांधकाम मराठी शाळेत ८ वर्ग खोल्या आहेत. येथे केवळ बालवाडी चालते. नवजीवन शाळेत २५ विद्यार्थी आणि १३ खोल्या वापराविना आहेत. वॉर्ड क्र. ९४ : खार जवाहरनगर शाळा : २०१५ मध्ये पाडली आहे. तळमजला तोडू नका, असे आदेश असताना बिल्डरने तळमजला तोडला. विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेत हलविण्यात आले. मात्र, शाळेचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. वॉर्ड क्र. ९५ : खेरनगर प्राथमिक शाळा : ४ मजले आहेत. यातील चौथा मजला खासगी कॉलेजला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. येथे इंग्रजी माध्यमासाठी ९ खोल्यांची मागणी आहे. वॉर्ड क्र. ९६ : शिवाजीनगर प्राथमिक इंग्रजी शाळा : अनेक गैरसोयी आहेत. शिक्षकांना कपाट नाही. वर्गात व्हाईट बोर्ड नाही. पाणी पिण्यासाठी मशीन नाही. शाळेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी नादुरुस्त आहे. त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होतो.