Join us

ईडीला आता कुणी घाबरत नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यानं व्यक्त केला संताप

By महेश गलांडे | Published: December 27, 2020 7:46 PM

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजावण्यात आली, त्यासंदर्भात नवाब मलिक यांना विचारले असता हे भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

ठळक मुद्देसंजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजावण्यात आली, त्यासंदर्भात नवाब मलिक यांना विचारले असता हे भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात आपणास काही कल्पना नाही, असे संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांना एकापाठोपाठ एक ईडीच्या नोटीस येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचेते नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी संताप व्यक्त केलाय.   

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजावण्यात आली, त्यासंदर्भात नवाब मलिक यांना विचारले असता हे भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, ईडीच्या कामकाजात केंद्राचा हस्तक्षेप असल्याचं दिसून येतंय, पण आता ईडीला कुणीही भीत नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. पवार साहेबांना नोटीस पाठविण्यात आली होती, पुढे काय झालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही ईडीची नोटीस पाठवली होती, पण पुढे काय झाल? असा सवालही मलिक यांनी विचारला आहे. ईडीकडून नोटीस पाठविण्यात येते, दोन दिवस चर्चा होते, संबंधित नेत्याची प्रतिमा मलिन करण्याचे हे प्रयत्न आहेत. महाराष्ट्रातील एका आयएएस अधिकाऱ्याला ईडी जॉईन होण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी नम्रपणे नकार दिला, कारण ईडीमध्ये सरकारचा हस्तक्षेपण आणि राजकारण चालत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, असं उदाहरणही मलिक यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना दिलं.   राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीकडून नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात खडसेंनी कबुली दिली असून बुधवारी आपण चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. आता, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. मात्र, मला याची काहीही कल्पना नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देतो, असेही संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलंय. 

खडसे बुधवारी हजर होणार

भोसरी येथील भूखंड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय(ईडी)कडून शनिवारी आपल्याला नोटीस प्राप्त झाली आहे. ३० डिसेंबरला मुंबईतील ईडी कार्यालयात बोलाविण्यात आले असून चौकशीत आपण सर्व सहकार्य करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी माध्यमांना दिली. या प्रकरणात ही पाचवी चौकशी असल्याचे त्यांनी सांगितले. भोसरी येथील भूखंड हा पत्नी मंदाकिनी यांनी खरेदी केला असून एकत्रित कुटुंब म्हणून कदाचित माझ्या नावाने ही नोटीस आली असेल, असेही खडसे म्हणाले. 

प्रताप सरनाईक यांनाही नोटीस

गेल्याच महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठविली होती. यानंतर त्यांच्या घरीदेखील छापे मारले होते. यामुळे आधीच केंद्र विरोधात राज्य सरकार असा कलगीतुरा रंगलेला असताना शुक्रवारी रात्री खडसेंना ईडीने नोटीस पाठविल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा भाजपा विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे.

टॅग्स :मनसेराज ठाकरेशिवसेनानवाब मलिकशरद पवार