Join us

एसटीचे बसस्थानक दत्तक घेण्यासाठी कुणीच पुढे येईना, महामंडळापुढे पेच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 2:15 PM

मुंबईत अल्प प्रतिसाद, संस्था, उद्योजकांकडून मागविले प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एसटी महामंडळाने स्वच्छ सुंदर बसस्थानकांसाठी एसटी बसस्थानक दत्तक योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या साठी महामंडळाने छोटे-मोठे उद्योग, व्यापारी संस्था, सहकारी संस्था, कारखाने यांच्याकडून प्रस्ताव मागितले होते, परंतु या बसस्थानक दत्तक योजनेला मुंबईत अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सहा बसस्थानके चकाकणार असल्याने बसस्थानक दत्तक घेण्यासाठी उद्योग, संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.

१ मे पासून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ राज्यातील ५८० बसस्थानकांवर राबविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील मोजक्याच जिल्ह्यात संस्था, उद्योगांनी स्वारस्य दाखविले आहे. मुंबईत मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. बसस्थानक दत्तक घेऊन वर्षभर स्वखर्चाने विकसित करून देखभाल करावी लागणार आहे. बसस्थानक देखभाल दुरुस्तीसाठी यापूर्वीच प्रस्ताव मागविण्यात आले आहेत; मात्र मुंबई विभागात बसस्थानकाचा विकास करण्यासाठी अल्प प्रतिसाद असल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आताही प्रस्ताव दाखल करता येणार आहे, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

सहा बसस्थानके होणार चकाचक

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 
  • मुंबई विभागातील सहा बसस्थानके दत्तक घेण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. 
  • सहा बसस्थानकांमध्ये मुंबई, परळ, दादर एसी बसस्थानक, कुर्ला नेहरू नगर, पनवेल आणि उरण यांचा समावेश आहे.

बसस्थानकात काय काय होणार?

दत्तक घेणाऱ्या संस्थांना बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची किरकोळ डागडुजी, विद्युत उपकरणाची दुरुस्ती करून विद्युत दिवे, पंखे सुव्यवस्थित करणे, रंगरंगोटी, प्रसाधनगृहाची किरकोळ दुरुस्ती करून स्वच्छ करणे प्रत्येक फलाटवर गावाचे मार्गदर्शक फलक, दैनंदिन स्वच्छता आदी कामे करावी लागतील.

प्रस्ताव दाखल करणाऱ्यांना काय मिळणार

या योजनेतंर्गत छोटे-मोठे उद्योग समूह, व्यापारी संस्था, सहकारी संस्था, कारखाने यांनी आपल्या परिसरातील एसटीची बसस्थानके दत्तक घेऊन त्याचा स्वखचनि विकास करून वर्षभर देखभाल करणे, या बदल्यात त्यांना त्यांच्या उत्पादनात अथवा सेवेची जाहिरात व थेट विक्री करण्याची संधी दिली जाणार आहे.

मुंबई विभागातील सहा बसस्थानके दत्तक देण्यात येणार आहेत. संस्था, उद्योगांनी बसस्थानक दत्तक योजनेसाठी प्रस्ताव दाखल करावे.- मोनिका वानखेडे, विभाग नियंत्रक, मुंबई विभाग

टॅग्स :एसटी