मुंबई :मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार घोषित झाले असून, बऱ्यापैकी सगळ्यांनी अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या सर्वच उमेदवारांच्या कडक उन्हात रॅली, विविध ठिकाणी संघटना, समुदायांना भेटीगाठी सुरू आहेत. मात्र, आतापर्यंत एकाही उमेदवाराने ‘हीट आयलॅंड’ अथवा मुंबईच्या पर्यावरणावर भाष्य केलेले नाही, अशी खंत पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
मुंबईचे हीट आयलॅंड झाले आहे, असे सांगत पर्यावरण अभ्यासक अमृता भट्टाचार्य म्हणाल्या, कमाल तापमान ४० अंशांवर आहे. भर उन्हातान्हात उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. एव्हाना रात्रही उष्ण असून, सायंकाळी सभा घेण्यावर भर दिला जात आहे, मात्र एकही उमेदवार पर्यावरणावर भाष्य करताना दिसत नाही. ‘आरे’च्या जंगलावर, तसेच वाढत्या काँक्रीटच्या जंगलावर बोलत नाही. वाढत्या प्रदूषणावर आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासावर कोणीच बोलत नाही, हे दुर्दैव आहे.
तिवरांवर काम करणारे अंकुश कुराडे म्हणाले की, पूर्व उपनगरात नाही, तर पश्चिम उपनगरात तिवरांची कत्तल होते. तिवरांच्या जंगलात बांधकामाचा डेब्रिज, चिखल ओतला जातो. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. या मुद्द्यावर उमेदवारांनी बोलले पाहिजे. जाहीरनाम्यात पर्यावरणाला स्थान दिले म्हणजे झाले, असे होत नाही. प्रत्यक्षात काम झाले पाहिजे.
१) पश्चिम उपनगरात पर्यावरणावर काम करणारे विनोद घोलप यांनीही केवळ निवडणुकीपुरता हा मुद्दा प्रचारात येण्याऐवजी यावर काम करण्याची गरज व्यक्त केली.
२) मुंबईच्या क्लायमेट ॲक्शन प्लॅनवर बोलले पाहिजे. हा आराखडा केवळ कागदावर राहता कामा नये. निवडणूक आली की, पर्यावरणावर बोलावे आणि नंतर काहीच करू नये, असे होता कामा नये. मुंबईला पर्यावरणस्नेही ठेवण्यासाठी प्रत्येक स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
काँक्रिटीकरणाचे तोटे-
१) मुंबईत बहुतांशी भागात रस्ते तसेच इमारतींमुळे काँक्रिटीकरण झाले आहे. तापत असलेले रस्ते थंड होण्यास वेळ लागत आहे. परिणामी तापमान सातत्याने अधिक नोंदविले जाते.
२) काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी मुरत नाही. ते थेट गटारे, नाले, नदीतून समुद्राला मिळत आहे. पावसाचे पाणी मुरेल, यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
... म्हणूनही तापमानात वाढ
१) उष्णता साठवून ठेवणाऱ्या वस्तूंमुळे शहरातील तापमान सभोवतालच्या तापमानापेक्षा २ ते ३ अंश अधिक नोंदविले जाते.
२) हरितगृह वायूमुळे वाढणारे तापमान रात्री दोन वाजेपर्यंत टिकून राहते. याला मायक्रो क्लायमेट चेंज असे म्हणतात.
३) इमारतींना गडद रंग लावू नयेत. फिका रंग लावल्याने सूर्यकिरणे परावर्तित होतील.
४) ग्रीन बिल्डींगची संख्या वाढविणे.
उपाय काय?
१) वायू प्रदूषणाचा प्रश्न सोडविणे.
२) रस्त्यासभोवताली आणि इमारतीलगत झाडे लावणे.
३) शहरी वनीकरणावर भर देणे.