Join us  

अरे कोण तोडणार मुंबई? मुंबई तोडण्याची हिंमत कोणी करूच शकत नाही; मुख्यमंत्री कडाडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 6:46 AM

आरोप- प्रत्यारोपांची आपली संस्कृती नाही

ठाणे - निवडणूक आली की मुंबई तोडणार, असे काही लोक म्हणतात. अरे कोण तोडणार मुंबई? मुंबई तोडण्याची हिंमत कोणी करूच शकत नाही. हे स्वप्न कोणी पाहू नये. पण मुंबई तोडणार म्हणत जे कोणी मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यात ते यशस्वी होणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पारसिकनगर येथील ९० फूट रस्ता येथे ‘मराठी बाणा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यात जे काही आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत, ती आपली संस्कृती नाही परंतु, आपण त्या आरोपांना त्यांच्या भाषेत उत्तर न देता कामानेच उत्तर देत असतो. दिवसरात्र मेहनत घेऊन राज्यासाठी आपण काम करतो. जे करतोय, ते आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी करतो आहे. आज काही लोक म्हणाले, शेतकऱ्यांना काय दिले? गेल्या आठ महिन्यांत शेतकऱ्यांना  साडेबारा हजार कोटी रुपये दिले. तसेच आपण ‘लाडकी लेक’ योजना सुरू केली. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली. त्यामुळे एसटी फुल्ल होऊ लागल्या आहेत. 

खारेगाव - पारसिकनगर विकासासाठी १०४ कोटी

कळवा - खारेगाव - पारसिकनगर विकासासाठी  १०४ कोटी रुपये दिल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. एकनाथ शिंदे तुमच्या हक्काचा मुख्यमंत्री आहे. ‘वर्षा’ आता सगळ्यांना खुले आहे, कधीही आपण ‘वर्षा’ बंगल्यावर या, मंत्रालयात, ठाण्यात भेटीला या, माझे काही नाही, आपल्या हक्काचे आहे. त्यामुळे आपण कधीही माझी भेट घेऊ शकता, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री झाल्यावर अनेक ठिकाणी सत्कार झाले पण आजचा सत्कार हा माझ्या परिवाराने केलेला सत्कार आहे, तो माझ्यासाठी खास  असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरे