Join us

'मला कुणीही संपर्क केला नाही'; भाजपामध्ये प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटीलांची प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 5:57 AM

असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

मुंबई : मला कुणीही संपर्क केला नाही, मी कोणालाही संपर्क केला नाही. त्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

 पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तो नेता म्हणजे जयंत पाटील असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्याने पाटील यांनी सोमवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत खुलासा केला.

मी अनेक महिने दिल्लीला गेलोच नाही, त्यामुळे माझी कोणाशी भेट होणे अशक्य आहे. मी १७-१८ वर्षे मंत्रिपदावर राहिलो आहे. त्यामुळे मला त्याबाबत प्रलोभने देऊ शकत नाहीत, असे पाटील खुलासा करताना म्हणाले.

भाजप प्रवेशासंदर्भात जयंत पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालेले अनेक नेते भाजपमध्ये येऊ इच्छितात. कधीही काहीही होऊ शकते. मोदींची गॅरंटी आणि आत्मनिर्भर भारत संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे येण्याची तयारी करीत आहेत.

- चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेशाध्यक्ष  भाजप.

जयंत पाटील, आमचे इतर काही नेते अशा सगळ्यांबद्दल रोज चर्चा असते. २०० आमदार, ३०० खासदार एवढी ताकद असूनही त्यांना आमच्याकडचे लोक हवे आहेत. याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे ना. एवढी ताकद असताना त्यांना आमच्यासारखे छोटे पक्ष हवेहवेसे वाटतात. काहीतरी असेल ना आमच्यात?

- खा. सुप्रिया सुळे,

नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा