Join us

"मी अजित पवारांएवढा अपमान कुणीच सहन केला नाही, दादा मन मोकळं करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 2:53 PM

अजित पवारांएवढा अपमान कुणीच सहन केला नाही, असेही धनंजय मुडेंनी म्हटलं. 

मुंबई - वांद्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात शक्तीप्रदर्शन सुरु आहे. शरद पवारांनी बैठक बोलावली होती, त्यासाठी व्हीप बजावण्यात आला होता. म्हणून प्रत्यूत्तर देण्यासाठी अजित पवारांनीही आमदारांची, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी इतरांवर असा प्रसंग आला नसेल पण माझ्यावर दुसऱ्यांदा आला असे सांगत कार्यकर्त्यांना भावूक करणारे भाषण केले. यावेळी, त्यांनी शरद पवार यांना सोडून जाताना दु:ख होत असल्याचं सांगितलं. पण, यावेळी अजित पवार यांचा अनेकदा झालेला अवमानही सांगितला. अजित पवारांएवढा अपमान कुणीच सहन केला नाही, असेही धनंजय मुडेंनी म्हटलं. 

शरद पवारांची थुंकीही ओलांडण्याची हिंमत नसलेले आज असा निर्णय घेत आहेत. एक व्यक्ती, ज्या व्यक्तीचा सगळ्यात जास्त अपमान होत असेल, मान खाली घालावी लागली असेल, अनेकदा ठेचा लागल्या असतील त्याचे नाव अजित पवार आहे. कितीही चांगली संधी मिळत असताना शरद पवारांच्या शब्दावर इतर सहकाऱ्यांना देण्याचे मन अजित पवारांचे आहे. एक प्रसंग आहे, जो मी आज सांगणार नाही पण कधीतरी नक्की सांगेन, असा इशाराही मुंडे यांनी दिला. तसेच, अजित दादांनी मन मोकळं करावं, दादांच्या मनात खूप साचलंय, दादा कधीतरी ते महाराष्ट्राला सांगून टाका, दादाच्या मनातलं त्यांच्या सावलीलाही ते सांगत नाहीत, असे म्हणत धनंजय मुंडेंनी अजित पवारांचा अनेकदा अपमान झाल्याची खंत बोलून दाखवली.  

माझ्या जिवनात हा प्रसंग दुसऱ्यांदा आला आहे. १९९९ ला राष्ट्रवादीची दैवत पवार साहेबांनी स्थापना केली. राज्याचा अध्यक्ष म्हणून भुजबळांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली. पहिल्याच वर्षी सत्ता आली. ही लोकं आजवर पवारांचा स्वाभिमान सांभाळत होती. त्यांची एवढी वर्षे सेवा केली. विठ्ठल आणि वारकऱ्यांचे हे नाते, याचा निर्णय घेताना काय वेदना होत असतील. पवारांना देखील स्वाभिमानासाठी निर्णय घ्यावा लागला होता. आता पवारांच्या बाजुला तीन चार बडवे आहेत. मुश्रीफ यांनी तुरुंगात काढली. रामराजेंनी पवारांसोबत काम केले. वळसे पाटलांनी आठ वर्षे सत्ता नसताना ट्रेनी पीए म्हणून सुद्धा काम केले आहे. हे लोक त्यांना सोडून का आले? अनेक कठीण प्रसंगात, जेव्हा २०१४ मध्ये परिस्थिती वाईट आली तेव्हा तटकरेंनी काम केले, आमदारांची संख्या ५४ वर गेली. आज माझे मन रडतेय, म्हणून माझे अश्रू तुम्हाला दिसत नाहीए, अजित पवारांनी इतकी वर्षे शरद पवारांसोबत राजकारण करत असताना किती वेदना सहन केल्या असतील, असा सवालही धनंजय मुंडेंनी विचारला. 

आमचे हिंदुत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य

उसतोड कामगाराच्या पोराला, ज्याला घरातून बाहेर काढले होते त्याला अजित पवारांनी आमदार केले, एवढ्या पदावर नेऊन ठेवले, आज ते अडचणीत असताना मी त्यांच्यासोबत उभा नाही राहिलो तर. काहीही झाले की टार्गेट कोण अजित पवार. प्रत्येक गोष्टीत अजित पवारांना बदनाम करतायत. माझे लोक देखील माझ्या तोंडावर थुंकले. तेव्हा नियत साफ होती म्हणून नियती माझ्यासोबत होती. आज तुमचीही नियत साफ आहे, नियती तुमच्यासोबत असल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय घेताना काय आरोप केले जातात. शिंदे-फडणवीसांसोबत गेले असा आरोप केला जातो. हिंदुत्व स्वीकारल्याचे म्हटले जातेय. हिंदुत्वाचा विषय आला की आम्हाला छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य दिसते, असे उत्तर धनंजय मुंडे यांनी दिले. 

शरद पवार हेच गुरू

माझे शरद पवार गुरु आहेत. त्यांनी शिकविलेला धडा, त्यांनी गिरवलेला धडा मी जर पुन्हा गिरवला असेल तर तो आदर्श समजायचा की अन्य काही ते तुम्ही ठरवा. मी तर नंतर आलेलो आहे. हे व्यासपीठावरील लोक तर आधीपासून काम करत होते. ही लोकशाही आहे की नाही, ही राष्ट्रवादीतील लोकशाही आहे. मला पुन्हा संधी दिली. आभार मानतो, असे धनंजय मुंडे म्हणाले.  

टॅग्स :अजित पवारधनंजय मुंडेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस