Uddhav Thackeray ( Marathi News ) : महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीसाठी १३ जागांवर मतदान सुरू असून यामध्ये मुंबईतील ६ जागांचाही समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे पूर्व येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
"सगळे मतदार जुमलेबाजीला त्रासलेले आहेत. तसंच देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्का यापुढेही अबाधित राहावा, यासाठी मतदान करत आहेत," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच पैशांचा पाऊस लोक स्वीकारणार नाहीत आणि पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात कशी आहे राजकीय स्थिती?
या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीकडून प्रचार केला जाताना स्थानिक विकासाच्या मुद्द्यांबरोबरच राष्ट्रीय मुद्द्यांचा देखील आधार घेतल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी मंत्री नसीम खान नाराज झाले होते. पक्षाने खान यांची नाराजी दूर केली असली तरी या काळात त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी चांदीवली येथील सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो.
२०१९ मध्ये काय घडले?
उमेदवार पक्ष प्राप्त मतेपूनम महाजन भाजप ४,८६,६७२ प्रिया दत्त काँग्रेस ३,५६,६६७ नोटा -- १०,६६९