'वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना कुणी तालुक्यातही ओळखत नाहीत'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:46 PM2019-03-19T17:46:55+5:302019-03-19T17:48:31+5:30
वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेच्या निवडणुकीत परिणाम दिसेल असे वाटत नाही
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी वंचित बहुजन आघाडीवर शाब्दीक स्ट्राईक केला आहे. वंचित बहुजन आघाडीची एकूण वाटचाल ही भाजपाला मदत करणारीच दिसून येत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे चारसुद्धा खासदार निवडणून येणार नाहीत. मुळात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना कुणी तालुक्यातही ओळखत नाही, असे मुंडेंनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेच्या निवडणुकीत परिणाम दिसेल असे वाटत नाही. मी चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरलो. वंचित आघाडी 2 किंवा 3 टक्क्यांपेक्षा अधिक मत घेणार नाही, असे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीला घेऊन महाआघाडी करण्यास उत्सुक होतो. आम्ही 4 जागांवरुन 2 ते 3 जागा वाढविण्यासही तयार होतो. मात्र, त्यांनी चर्चा करण्यास पूर्णत: नकार दिला. यावरुन भाजपला मदत करण्यासाठीच वंचित आघाडीचा प्रयत्न असल्याचं मुंडेंनी म्हटले आहे
प्रकाश आंबेडकरांच्या वागण्यातून जे दिसतंय, ते कुठेतरी भाजपाला मदत करण्यात येत असल्याचं स्पष्ट होतंय. 23 मे रोजी जेव्हा निकाल लागेल, तेव्हा तुम्हाला वंचित आघाडीबद्दल दिसेल. वंचित आघाडीचे 4 सुद्धा खासदार निवडून येणार नाहीत. वंचित आघाडीच राजकारणं हे संघ आणि भाजपाला मदत करण्यासाठी असल्याचं महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात आलंय, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितल. एका वेबसाईला दिलेल्या मुलाखतीवेळी धनंजय मुंडेंनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने 37 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, माढा, उस्मानाबाद, लातूर आणि बारामती राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातही उमेदवार दिले आहेत.