Join us

अहंकार अन् हट्टापायी आरे कारशेडला खीळ ठोकण्याचे काम कुणी करू नये- प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 9:54 PM

आदित्य ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

आरेमध्येच कारशेड करण्याच्या निर्णयावर, आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन केले आहे. हीच री आदित्य ठाकरे यांनीही ओढली आहे. सध्या आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा काढत पुन्हा एकदा पक्षाची मोट बांधण्यासाठी सक्रीय झाले आहेत. आरे वाचवा आंदोलनात लहान मुलांचा वापर होत असल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये आले आहे. 

आदित्य ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईकरांच्या हितासाठी मेट्रो अत्यावश्यक असून आरे कारशेडमुळे हा प्रकल्प लांबलेला आहे. केवळ आपल्या अहंकार आणि हट्टापायी या प्रकल्पाला खीळ ठोकण्याचे काम कुणी करू नये; अशी तमाम मुंबईकरांची भावना आहे. काही निवडक लोकांना हाताशी धरून या प्रकल्पावरून नवीन मुद्दा तयार करून मुंबईकरांमध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले जात आहे. हे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नाही, नाहीतर खंजीर खुपसण्याचे कारण नव्हते. शिवसेना चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकेंसोबतच राहणार आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेआरेमेट्रोशिवसेना