कोणाची हिंमत होता कामा नये; राज ठाकरेंनंतर फडणवीसांनीही दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 03:49 PM2021-09-01T15:49:22+5:302021-09-01T15:50:37+5:30
राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनाही या हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनीही या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला.
मुंबई - ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पक्षाकडून फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कल्पिता पिंपळे यांच्या स्पीरटचं कौतुक केलंय.
राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनाही या हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनीही या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला. तसेच, आपण सर्वांनी सहआयुक्त कल्पिता पिंगळेंच्या पाठिशी उभं राहायला हवं, असेही फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, पुन्हा कोणीही असा हल्ला करणार नाही, अशी जरब बसवली पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.
The attack on lady officer in Thane is heinous..
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 1, 2021
ठाण्यातील महिला अधिकार्यावर झालेला हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे. पुन्हा कुणी असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही, अशी जरब बसविली पाहिजे.
नवी मुंबई येथे माध्यमांशी साधलेला संवाद...#NaviMumbaipic.twitter.com/IpcCRhjufc
ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्यानं ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यानं कोयत्यानं केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं तुटली आणि त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. कल्पिता पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल असून नुकतीच त्यांच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रीया देखील झाली आहे.
राज ठाकरेंनी दिला होता इशारा
राज ठाकरे यांनी याआधीच कृष्णकुंजवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला होता. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केलेला फेरीवाला पोलिसांच्या तावडीतून सुटला की मनसैनिक त्याला चोप देतील असं रोखठोक विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीसाठी ठाण्यात पोहोचले होते.