कोणीही उपाशी राहता कामा नये...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:12 PM2020-04-19T14:12:51+5:302020-04-19T14:13:21+5:30
आज अयोध्येतल्या प्रत्येक घरात चूल पेटते आहे; तशी चूल मुंबईतल्या प्रत्येक घरात पेटली पाहिजे
आज अयोध्येतल्या प्रत्येक घरात चूल पेटते आहे; तशी चूल मुंबईतल्या प्रत्येक घरात पेटली पाहिजे
जनता कर्फ्यूदरम्यान अयोध्येत अडकलेल्या मुंबईच्या प्रमोद पंडीत जोशी यांच्याशी ‘लोकमत’ ने साधला संवाद
मुंबई : अयोध्येत आजघडीला प्रत्येक घरात चूल पेटते आहे. मागून जेवणारे जे आहेत; किंवा ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांच्यासाठी वेगळी भोजनालये सुरु झाली आहेत. ज्याच्या घरात चूल पेटत नाही; त्याला जेवण मिळत आहे. इकडे भिकारीसुध्दा उपाशी झोपत नाही. जो मागून खात आहे; त्या प्रत्येकाला जेवण मिळत आहे. कारण येथील प्रत्येक माणसाची व्यवस्था सरकारने केली आहे. एकंदर काय लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांची अशी अवस्था होऊ नये. अयोध्येमध्ये ज्या प्रमाणे प्रत्येक घरात चूल पेटते आहे; तशी चूल मुंबईतल्या प्रत्येक घरात पेटली पाहिजे; अशी प्रांजळ भूमिका प्रमोद पंडीत जोशी यांनी मांडली. राम जन्मभूमीच्या कामासाठी अयोध्येत गेलेले जोशी आजघडीला लॉकडाऊनमुळे तेथेच अडकले असून, तेथील व्यवस्थेबाबात जोशी यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. जोशी यांच्याशी झालेली ही बातचीत खास ‘लोकमत’ च्या वाचकांसाठी.
मी लॉकडाऊनमुळे अयोध्येत अडकलो आहे, असे सांगत प्रमोद पंडीत जोशी म्हणाले, मी राम जन्मभूमीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात लढत होतो. याबाबतच्या काही कामासाठी मी अयोध्येत आलो होतो. राम मंदिराचा वाद संपला की, राम मंदिराचा मार्ग मोकळा झाली की केस कापण्यासाठी शरयू नदीवर येईल, असा संकल्प केला होता. त्या संकल्पानुसार, शरयू नदीवर आलो आणि केस, दाढी कापली. हे होत असतानाच जनता कर्फ्यू लागला; आणि मी येथे अडकलो. आता येथे राहण्याची व्यवस्था आहे. येथे जशी व्यवस्था आहे; अशी आपल्याकडे झाली पाहिजे. येथे भिकारीसुद्ध उपाशी नाही. आपल्याकडेही कोणी उपाशी राहता कामा नये. एक सामान्य गोष्ट सांगतो. वीस ते पंचवीस दिवस झाले. लॉकडाऊन आहे. यावेळेपर्यंत लोकांकडे पैसा होता. म्हणून त्यांनी निभावून नेले. आता लोकांकडून मिळत असलेल्या गोष्टींवर चूल पेटते आहे. किंवा जेवण मिळत आहे. आता हा काळही संपत आहे. किती दिवस काय पुरणार? हा प्रश्न आहे. या गोष्टी रोज लागत आहे. त्याशिवाय घर चालत नाही. परिणामी कार्डधारकांच्या घरी रेशन पोहचले पाहिजे. आणि हे थेट सरकारने करावे. त्यामुळे गरिब रेशनवरच्या साहित्याचे लाभार्थी होतील. आजघडीला रेशनच्या दुकानावर केवळ तांदूळ मोफत मिळत आहेत. असे होता कामा नये. आता सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती आहे. लोकांना बाहेर पडता येत नही. अशावेळी रेशनच्या दुकानावर मोफत तांदूळासोबत तेल, गहू, साखर, दाळ हे साहित्यदेखील मिळाले पाहिजे. यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला पत्र पाठविलेले नाही. किंवा सरकारकडे अशी कोणतेही मागणी केलेली नाही. कारण आताच्या काळात कोणी मागणी करण्यापूर्वी सरकारने या गोष्टी करणे गरजेचे आहे, असे मला वाटते. सामान्य प्रतिक्रिया म्हणून रेशनच्या दुकानावर या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, असे मला वाटते. रेशन दुकानावर आलेली प्रत्येक गोष्ट सर्वसामान्यांना मिळेल, याची शाश्वती नसते. कमीत कमी या वस्तू वॉर्डनिहाय लोकांना मिळाल्या पाहिजेत. यासाठी सरकारने काम केले पाहिजे. दरम्यान, अयोध्येबाबत जोशी म्हणाले, येथील सरकारने अयोध्येतील लोकांची उत्तम व्यवस्था केली आहे. येथे कोणीच उपाशी झोपत नाही. प्रत्येकाला जेवण मिळते आहे. आपल्या सरकारनेही असे काहीसे करावे.