मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी गुरुवारी विशेष पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पदाची निर्मिती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर, भारती यांनी ‘मुंबई पोलिस दल ही एक टीम... इथे कोणीही सिंघम नाही,’ असे सूचक ट्वीट केले. आयुक्तालयात याच ट्वीटची चर्चा होती.
देवेन भारती हे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांनी कायदा व सुव्यवस्था पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या कार्यालयात पदभार स्वीकारला. यादरम्यान पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि चौधरी यांची भेट घेत चर्चा केली. तसेच, नवीन इमारतीतही कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यादरम्यान माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
विशेष सीपी बसणार कुठे?दुसऱ्या मजल्यावर पोलिस आयुक्तांच्या शेजारी असलेल्या कायदा व सुव्यवस्थेसह आयुक्तांच्या कार्यालयात ते बसणार आहेत. तर सहआयुक्त जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर आयुक्तांच्या जुन्या कार्यालयात बसणार आहेत.