Join us

वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नाही, न्यायमूर्ती लोयांच्या मुलाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 6:31 PM

सोहराबुद्दीन शेख प्रकरणात सुनावणी करत असलेले न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्युबाबत न्यायमूर्ती लोयांचा मुलगा अनुज याने आज प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई  - सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात सुनावणी करत असलेले न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्युबाबत न्यायमूर्ती लोयांचा मुलगा अनुज याने आज प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्युबाबत आपला कुणावरही संशय नसल्याने न्या. लोया यांचा मुलगा अनुज लोया याने म्हटले आहे.   

न्यायमूर्ती लोया यांचा मुलगा अनुप लोया याने रविवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात तो म्हणाला," न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत सुरू असलेल्या वादामुळे आम्हाला त्रास होत आहे. या प्रकरणी आम्हाला त्रास देऊ नका. माझ्या वडिलांच्या मृत्यूबाबत आमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही."

काही एनजीओ आणि वकीलांनी या प्रकरणावरून आमचा पिच्छा पुरवला आहे.  लोया यांच्या मृत्यूबाबत आमच्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय नाही. असेही लोया यांच्या परिवाराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात  शुक्रवारी सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे न्या. बी.एच. लोया यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मागितला आहे. तसंच हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.  1 डिसेंबर 2014 रोजी नागपूर येथे हृदयक्रिया बंद पडून न्या. लोया यांचा मृत्यू झाला. तशी इस्पितळातील नोंद आहे. ते आदल्या दिवशी एका सहका-याच्या मुलीच्या विवाह समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या पुढे चालू असलेला खटल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. न्या. लोया यांच्या बहिणीने न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याशी असलेल्या संबंधाच्या अनुषंगाने मीडियाकडे संशय व्यक्त केल्याननंतर हे प्रकरण पुढे आले होते. महाराष्ट्रातील पत्रकार बी.आर. लोणे यांची याचिका विचारार्थ घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए.एम. खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :न्या. लोया मृत्यू प्रकरणन्यायालयभारतसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण