मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र लोक माझे सांगाती हे पुस्तक चांगलेच गाजले होते. या पुस्तकाचा आता दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. ऐन पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यातच शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर, पवारांच्या या घोषणेचा महाविकास आघाडीवरही परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी एकजुट कायम राहिल असे म्हटले.तसेच, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा निर्णय अंतिम झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून महाविकास आघाडी आणि शिवसेनेबाबतही भूमिका मांडली आहे. तर, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या चर्चांवरही पवारांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले. शरद पवारांनी पुस्तकात मांडलेल्या मतासंदर्भात उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच, महाविकास आघाडीला तडा जाणार नाही, असेही स्पष्ट केले. ''मी माझ्या मतावर ठाम आहे, मी माझी मतं यापुढेही ठामपणे मांडतच राहणार आहे. मात्र, महाविकास आघाडीला माझ्याकडून कुठेही तडा जाणार नाही, एवढी काळजी मी घेईन,'' असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
आत्मचरित्रात शरद पवार काय म्हणतात
'मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो', असं पवार यांनी पुस्तकातील पान नंबर ४१७ वर लिहिले आहे. त्यामुळे, शिवसेनेकडून सातत्याने मुंबईचा दाखला देत भाजपला लक्ष्य केलं जातं. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचाही आरोप करण्यात येतो. मात्र, शरद पवार यांच्या विधानामुळे आता शिवसेनेची कोंडी झाली आहे. आता, पवारांच्या या भूमिकेवर शिवसेना काय मत मांडते हे पाहावे लागणार आहे.