मुंबई : राज्यातील विद्यार्थी सुरक्षित आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, कुणी प्रयत्न केला, तर त्याचे काय करायचे ते करू, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेएनयूतील मारहाणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिला. मुख्यमंत्री म्हणाले की, जेएनयूत जे घडले ते दुर्दैवी आहे. त्या हल्ल्याची नि:पक्ष चौकशी झाली पाहिजे. मला खात्री आहे, केंद्र सरकार हल्लेखोरांचा खरा चेहरा समोर आणेल आणि त्यांना शिक्षा देईल. मुखवटे घालून यायचे आणि हल्ले करायचे हे भेकडपणाचे लक्षण आहे. हल्लेखोरांमध्ये हिंमत होती, तर त्यांनी मुखवट्यांशिवाय यायचे होते. त्या घटनेने मला मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याची आठवण झाली.केंद्र सरकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा या हल्ल्यात हात होता का, यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. मला या विषयाचे राजकारण करायचे नाही, पण त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली नाही, तर या हल्ल्याला कुणाचे समर्थन होते का, याबाबत संशय बळावेल.युवकांत अस्वस्थता व असुरक्षिततेची भावना आहे. आज वसतिगृहांतील युवक, युवती सुरक्षित नसतील, तर अशी भावना येणारच. त्यांना विश्वासात घ्यावे लागेल, ही भूमिका मी आधीदेखील मांडलेली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.>केंद्र सरकारच जबाबदार-अशोक चव्हाण जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला भयंकर आहे. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतलेली दिसते. या प्रकरणात भाजपप्रणित अभाविपचे नाव पुढे आले आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जेएनयूतील घटेनेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची आहे.
महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 6:45 AM