लसीकरणाची ऑनलाइन वेळ मिळेना; प्रमाणपत्रातही घोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:00 AM2021-05-08T06:00:21+5:302021-05-08T06:00:44+5:30

नागरिकांत नाराजी; केंद्रावर कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत

No online vaccination time available; Confusion in the certificate | लसीकरणाची ऑनलाइन वेळ मिळेना; प्रमाणपत्रातही घोळ

लसीकरणाची ऑनलाइन वेळ मिळेना; प्रमाणपत्रातही घोळ

Next

मुंबई : लसीकरण केंद्रावरील नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका ऑनलाईन नोंदणी व वेळ घेणाऱ्यांनाच प्रवेश देत आहे. मात्र बुकिंगपूर्वीच वेळ संपणे, केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून असहकार्य यामुळे गोंधळात भर पडली आहे. त्यात लस घेतल्यानंतरही प्रमाणपत्र मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत २५ लाखांहून अधिक लोकांनी लस घेतली. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र लसींचा मर्यादित साठा मिळत असल्याने मोहीम थंडावली आहे. लस मिळेल की नाही? या भीतीने नागरिकांची केंद्रावर गर्दी वाढली आहे. यामुळे संसर्गाचा धोका वाढला आणि पालिकेने गुरुवारपासून ऑनलाईन नोंदणी, वेळ घेणे बंधनकारक केले.

प्रत्येक विभागात केंद्र सुरू करणार!
संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे लवकरात लवकर लस घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. काही दिवसांत प्रत्येक विभागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल. त्यामुळे आपल्याच विभागात लसीकरणाची वेळ मिळणे शक्य होईल, असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्लाॅटवरील प्रवेशास निर्बंध...
ऑनलाइन वेळ घेणे बंधनकारक आहे. मात्र लसीच्या स्लॉटबद्दल रीअल-टाइम माहिती मिळविण्यासाठी बर्‍याच नवीन वेबसाइट्स कोविन ॲप वापरतात. बहुतेकवेळा शेकडो स्लॉट्स काही मिनिटांतच बुक करतात. त्यामुळे स्लॉटवरील प्रवेशावर निर्बंध आणण्यात येत आहेत. 

अरे, हे काय? प्रमाणपत्रातील वय, लिंग चुकीचे
मुंबईत बहुतांश कार्यालयांमध्ये कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. मात्र कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे अनेकांना लस घेतल्यानंतरही प्रमाणपत्र मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे लस घेतलेली असतानाही अशा कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयात जाता येत नाही. तसेच प्रमाणपत्रावर वय, लिंग यामध्ये घोळ असणे, तसेच दोन्ही डोस घेतले तरी दोन्ही प्रमाणपत्रांवर पहिलाच डोस घेतल्याचा उल्लेख असणे, असे प्रकार घडत आहेत. यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पालिकेकडून पाठपुरावा सुरू
तांत्रिक अडचणींबाबत वेळोवेळी केंद्र सरकारला कळविण्यात आले आहे. त्यानुसार प्रमाणपत्रातील घोळ दुरुस्त करण्यासाठी पालिकेमार्फत पाठपुरावा सुरू असतो. नोंदणी आणि वेळ ऑनलाइन घेणे बंधनकारक केल्यानंतर आता लसीकरण केंद्रावरील गर्दीही नियंत्रणात येत आहे.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त पालिका आयुक्त)

 

Web Title: No online vaccination time available; Confusion in the certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.