'25 जानेवारीला 'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 11:57 AM2018-12-27T11:57:00+5:302018-12-27T12:00:19+5:30
Thackeray Movie : येत्या 25 जानेवारी रोजी 'ठाकरे' सिनेमाशिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर बुधवारी (26 डिसेंबर) रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर आता सिनेमाबाबतची उत्सुकता सिनेरसिकांमध्ये ताणली गेली आहे. 25 जानेवारीला ठाकरे सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये ठाकरे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण रिलीजपूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमातील दोन दृश्य आणि तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. यादरम्यानच शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
येत्या 25 जानेवारी रोजी 'ठाकरे' सिनेमाशिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा बाळा लोकरे यांनी दिला आहे. 25 जानेवारीला इतर कोणताही चित्रपट आम्ही चालू देणार नाही. जर कोणी इतर चित्रपट प्रदर्शित करणार असेल तर त्याला शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, असा धमकीवजा इशारा लोकरे यांनी दिला आहे.
ना नवाजुद्दीनचा, ना सचिन खेडेकरांचा; बाळासाहेबांना 'आवाssज' हवा बाळासाहेबांचाच! https://t.co/bO1KdKamQA#Thackeray#ThackerayTrailer#NawazuddinSiddiqui
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 27, 2018
'ठाकरे' सिनेमासह 25 जानेवारी रोजी कंगणा राणौतची मुख्य भूमिका असलेला 'मणकर्णिका' सिनेमा आणि इम्रान हाश्मीचा'चीट इंडिया' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना चित्रपट सेनेनं दिलेल्या इशाऱ्यानंतर आता बॉलिवूड सिनेमे माघार घेणार का?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, ठाकरे सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे. दरम्यान, बाळासाहेबांच्या भूमिकेनंतर या सिनेमात सर्वात मोठी भूमिका दत्ता साळवींची आहे. अभिनेता, लेखक प्रवीण तरडे ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमाची पटकथा लिहिली असून यासाठी त्यांना चार वर्षे लागली.
ठाकरे सिनेमातील या संवादांवर आक्षेप
एक संवाद बाबरी मशिदीशी निगडीत आहे. तर दुसरा संवाद हा दक्षिण भारतीयांशी संबंधित आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मुंबईतील दक्षिण भारतीयांवर कडाडून टीका केली होती. दक्षिण भारतीयांमुळे स्थानिक मराठी माणसाचा रोजगार जातो, अशी भूमिका त्यावेळी बाळासाहेबांनी घेतली होती. यावर आधारित सिनेमातील संवादावर सेन्सॉर बोर्डानं हरकत नोंदवली. या संवादात 'यांडू गुंडू' असे शब्द आहेत.