मुंबई - 25 जानेवारी रोजी 'ठाकरे' सिनेमाशिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकीवजा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला आहे. सोशल मीडिया साइट फेसबुकद्वारे लोकरे यांनी ही धमकी दिली आहे. दरम्यान, सिनेमा प्रदर्शनाच्या या वादावर शिवसेना खासदार आणि ठाकरे सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'ठाकरे' व्यतिरिक्त 25 जानेवारीला कोणताही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर बुधवारी (26 डिसेंबर) रिलीज करण्यात आला. 25 जानेवारीला ठाकरे सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये ठाकरे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण रिलीजपूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमातील दोन दृश्य आणि तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. यादरम्यानच शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
बाळा लोकरेंची धमकी
25 जानेवारीला इतर कोणताही चित्रपट आम्ही चालू देणार नाही. जर कोणी इतर चित्रपट प्रदर्शित करणार असेल तर त्याला शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, असा धमकीवजा इशारा लोकरे यांनी दिला आहे.
'ठाकरे' सिनेमासह 25 जानेवारी रोजी कंगणा राणौतची मुख्य भूमिका असलेला 'मणकर्णिका' सिनेमा आणि इम्रान हाश्मीचा'चीट इंडिया' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना चित्रपट सेनेनं दिलेल्या इशाऱ्यानंतर आता बॉलिवूड सिनेमे माघार घेणार का?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठाकरे सिनेमातील या संवादांवर आक्षेप
एक संवाद बाबरी मशिदीशी निगडीत आहे. तर दुसरा संवाद हा दक्षिण भारतीयांशी संबंधित आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मुंबईतील दक्षिण भारतीयांवर कडाडून टीका केली होती. दक्षिण भारतीयांमुळे स्थानिक मराठी माणसाचा रोजगार जातो, अशी भूमिका त्यावेळी बाळासाहेबांनी घेतली होती. यावर आधारित सिनेमातील संवादावर सेन्सॉर बोर्डानं हरकत नोंदवली. या संवादात 'यांडू गुंडू' असे शब्द आहेत.