मुंबई - माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची वैद्यकीय कारणास्तव २ महिन्यांच्या जामीनावर सुटका झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या दीड वर्षापासून ते तुरुंगात असून आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. तर, आज प्रफुल्ल पटेल यांनीही मलिक यांची भेट घेतली. त्यामुळे, ते कोणत्या गटात जाणार याची चर्चा होत आहे. मात्र, तुर्तात कुठल्याही गटात किंवा पक्षात न जाता केवळ प्रकृतीवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे,
नवाब मलिक यांचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या भेटीला जात होते. यामुळे मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर अजित पवार गटासोबत जाणार असल्याचे तर्क लावले जात होते. तर, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासमवेतही त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे, ते शरद पवारांना सोडणार नाहीत, अशीही चर्चा आहे. आता, मलिक कोणत्या गटासोबत जाणार, राजकीय चर्चा होत असताना, तुर्तास ते राष्ट्रवादीच्या कुठल्याही गटात किंवा पक्षात जाणार नाहीत. मलिक हे आजारपणामुळे बाहेर आले आहेत, त्यामुळे प्रकृती स्वास्थकडेच त्यांचे लक्ष असणार आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. नवाव मलिक यांना किडनीचा विकार (Kidney disorder) आहे. त्यांची एक किडनी निकामी झाली आहे. त्यामुळे, त्यांच्यावर कुर्ला इथल्या क्रिटी केअर रूग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
२५ ते ३० किलो वजन घटलं
मलिक यांचे मोठे भाऊ कप्तान मलिक यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. नवाब मलिक यांचं २५ ते ३० किलो वजन घटलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितल्याचं कप्तान मलिक यांनी सांगितलं.
प्रफुल्ल पटेल यांनी घेतली भेट
नवाब मलिक यांना सध्या उपचाराची गरज आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिन मिळाला आहे. यामुळे त्यांना राजकारणात घेण्यापेक्षा त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे. यामुळे आम्ही कोणासोबत जाणार किंवा कोणतीही राजकीय चर्चा केलेली नाही. तर मलिक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांचे वजन कमी झालेले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर माणसाची प्रकृती कशी असते तुम्हालाही माहिती आहे. त्यांना पुढे आणखी कुठे उपचार घ्यायचे आहेत, याबाबत चर्चा केल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.