मुंबई : ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा पॅचअप होणार अशा चर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे रंगल्या होत्या. यावर विचारलेल्या प्रश्नाला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिले आहे. पॅचअप करायचे म्हणजे काय करायचे? माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्या मनात काय आहे हे त्यांना विचारा, असे म्हणत त्यांनी चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला आहे.
कसब्यातील विजयानंतर काँग्रेस नेते आमदार रवींद्र धंगेकर यांनी सपत्निक ‘मातोश्री’वर जाऊन बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधक ताकदीनिशी एकत्र आले तर आपण भाजपला अस्मान दाखवू शकतो याचा आत्मविश्वास रवींद्र धंगेकर यांनी दिला. त्यामुळे पुढच्या निवडणुकीतही याच पद्धतीने काम करुन आगामी निवडणुका जिंकू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
पंतप्रधान होणार का? स्वप्नात रमणारा मी नाही!भाजपविरोधात मजबुतीने उभा ठाकण्यासाठी विरोधी पक्षांकडून तुमचं नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या. “माझ्या मनात असे कोणतेच स्वप्न नाही. स्वप्नात रमणारा-दंगणारा मी नाही. जी जबाबदारी येते ती मी पार पाडतो” असे ठाकरे म्हणाले.