Join us

पगारवाढ नाही, आता बॉन्डेड डॉक्टर नाराज; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या दरबारात गाऱ्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 9:17 AM

उपनगरीय रुग्णालयातील एसएमओ आणि एसआर ही एकच पोस्ट करा, यासह अन्य काही मागण्यांचा डॉक्टरांनी दिलेल्या पत्रात समावेश आहे.

मुंबई : प्रमुख रुग्णालयांत आणि उपनगरीय रुग्णालयांत सारखेच काम असताना देखील बॉन्डेड डॉक्टरांचे वेतन मानधन वाढविले, पण उपनगरीयमधील सिनियर बॉन्डेड डॉक्टरांचे  वेतन न वाढविल्याने बंधपत्रित डॉक्टर्स नाराज  झाले आहेत. त्यामुळे, उपनगरीय रुग्णालयांतील वरिष्ठ निवासी डॉक्टरांसोबत दुजाभाव झाला असून लवकर जुन्या आणि नवीन मागण्यांकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी करीत बंधपत्रित डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्र दिले. उपनगरीय रुग्णालयातील एसएमओ आणि एसआर ही एकच पोस्ट करा, यासह अन्य काही मागण्यांचा डॉक्टरांनी दिलेल्या पत्रात समावेश आहे. तसेच १५०० निवासी डॉक्टर्स, ज्यांनी कोविडमध्ये पहिल्या दिवसापासून दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केले होते, या निवासी डॉक्टरांना न्याय मिळावा, ही विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. विविध पालिका रुग्णालयांमध्ये वरिष्ठ निवासी आणि बंधपत्रित एसएसओ स्टायपेंड वेगळा आहे. एमडी, एमएस परीक्षा उत्तीर्ण सर्व बंधपत्रित डॉक्टरांना स्टायपेंड एकसमान असावे. एनएमसीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या परिपत्रकानुसार, शिक्षक पदाचे एसआर पदावर रूपांतर करावे, एनएमसीनुसार सर्व बंधपत्रित उमेदवारांसाठी एकसमान पद असावे, आदी मागण्या या पत्रात करण्यात आल्या आहेत. हे पत्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक आणि सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठात्यांना दिले आहे.