राणेंच्या परवानगीची गरज नाही
By admin | Published: January 13, 2016 09:38 PM2016-01-13T21:38:49+5:302016-01-13T23:53:03+5:30
राजन तेली : तुम्ही आयत्या बिळावर नागोबा, नीलेश राणेंवर टीकास्त्र
कणकवली : सिंधुदुर्गात अन्य कोणी उद्योग-व्यवसाय करू नये, अशी राणे कुटुंबियांची भावना आहे. आरोंदा जेटीसंदर्भात कोर्ट योग्य तो निर्णय देईल. त्यासाठी राणे कुटुंबियांच्या परवानगीची गरज नाही, असे टीकेला प्रत्युत्तर देतानाच आम्ही कार्यकर्त्यांनी संघटना वाढवली. तुमच्यासारखे आयत्या बिळावर नागोबा झालो नाही. तुम्हा लोकांचा हस्तक्षेप वाढल्यानंतर कॉँग्रेसची आजची स्थिती ओढवली आहे, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांच्या वक्तव्यांवर भाजपचे सरचिटणीस राजन तेली यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. आरोंदा जेटी सुरू करण्यासाठी नारायण राणेंना पैशांची ‘आॅफर’ दिल्याचा माजी खासदार नीलेश राणे यांनी तेली यांच्यावर आरोप केला होता. तेली म्हणाले की, नारायण राणे यांच्या मंत्रीपदाच्या काळातच जेटीला परवानगी मिळाली आहे. यासोबत कोकण पट्ट्यातील इतर जेटींनाही परवानगी मिळाली. स्थानिकांचा पुळका होता तर तेथून थोड्या अंतरावर असलेल्या समृद्धी रिसोर्सला मायनिंगसाठी परवानगी का दिली? तसेच नारायण राणे यांनी स्वत:च्या दोन ते तीन कंपन्यांनाही परवानगी मिळवली. नीलेश राणेंनी माझ्या रोजगाराची काळजी करू नये. माझ्या रोजगाराबाबत त्यांनी आपल्या घरात चौकशी करावी. १९८३पासून माझा व्यवसाय आहे. नीलेश राणेंनी एकेरी भाषा वापरून आपले संस्कार दाखवले आहेत. मी कोणालाही जेटीच्या मध्यस्थीसाठी पाठवलेले नाही. आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये. सर्व उद्योग आपल्याच हाती असावेत, अशी नारायण राणे यांची भूमिका आहे. एक राजन तेली वाईट असेल तर बारापैकी अकरा आमदार तसेच पदाधिकारी सोडून का गेले? मी चांगले काम केले नाही तर पक्षात का ठेवले होते? असा प्रश्न तेली यांनी उपस्थित केला. आम्ही केलेली कामे राणे कुटुंबियांच्या नावावर जमा झाली. अन्य पक्षात फोडाफोडी करून जमा केलेली कॉँग्रेस ही आत्ता पक्षाला आलेली सूज आहे. कॉँग्रेसअंतर्गत प्रचंड नाराजी असून, कार्यकर्ते नेत्यांवर व पक्षावर नाराज आहेत. (प्रतिनिधी)
जोरदार टीका : प्रतिज्ञापत्र करूनच ठेवले आहे.
विधानसभा निवडणुकीत रवींद्र फाटक पराभूत झाल्यानंतर सुदन बांदिवडेकर यांचे बोट छाटले गेले. आता राणे यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्याचवेळी कॉँग्रेस सोडूया, असे सांगितले होते. परंतु, नीलेश राणे यांच्या प्रेमापोटीच मी थांबलो होतो. आम्ही कोणालाही घाबरत नाही. कोण राहणार ते काळच ठरवेल. आम्ही प्रतिज्ञापत्र करूनच ठेवलेले आहे, असे तेली यावेळी म्हणाले.
आरोपांचा समाचार.
राजन तेली यांनी यावेळी राणे यांच्यावर जोरदार टीका केली. मंगळवारी माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या टीकेला तेली यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राणे यांच्या विविध आरोपांचा यावेळी त्यांनी समाचार घेतला.