मागण्या मान्य झाल्याशिवाय नाट्यप्रयोग नाहीत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:12+5:302021-06-18T04:06:12+5:30
मुंबई : लॉकडाऊनमुळे गेले १५ महिने महाराष्ट्रातील व्यावसायिक नाटकांचे प्रयोग बंद आहेत. आजपर्यंत आम्ही महाराष्ट्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला ...
मुंबई : लॉकडाऊनमुळे गेले १५ महिने महाराष्ट्रातील व्यावसायिक नाटकांचे प्रयोग बंद आहेत. आजपर्यंत आम्ही महाराष्ट्र सरकारसोबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, सरकारने रंगमंच कामगारांना काहीही मदत केलेली नाही. जोपर्यंत ही मदत मिळत नाही; तोपर्यंत रंगमंच कामगार नाट्यप्रयोग करणार नाहीत, अशी भूमिका रंगमंच कामगार संघाने घेतली आहे.
रंगमंच कामगार संघाच्या कार्यकारिणीची बैठक १६ जून रोजी झाली. यात दोन महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले असल्याची माहिती रंगमंच कामगार संघाचे प्रवक्ते रत्नकांत जगताप यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने ७५० मराठी नाट्य व्यावसायिक रंगमंच कामगारांना दरमहा प्रत्येकी पाच हजार रुपये आर्थिक मदत करावी. तसेच सरकारने महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहे एकाचवेळी सुरू करावीत; असे हे दोन ठराव आहेत. या दोन मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत; तोपर्यंत महाराष्ट्रात कोणताही नाट्यप्रयोग रंगमंच कामगार करणार नाहीत, असे रंगमंच कामगार संघाच्यावतीने रत्नकांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------