मुंबईत अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:20 AM2020-03-11T01:20:19+5:302020-03-11T01:20:37+5:30
राज्यातही ३०९ पैकी २८९ जणांचे कोरोनासंदर्भातील अहवाल निगेटिव्ह
मुंबई : मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत १३३ कोरोना संशयित रुग्णांची नोंद झाली. मात्र, अद्याप त्यातील एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही, तसेच ६ जणांचे रिपोर्ट्स अद्याप येणे बाकी असल्याची माहिती मुंबई पालिका रुग्णालाय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईत अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसताना पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे, तसेच राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
१० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,१०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले. ब्युरो आॅफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि द. कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवासी आल्याची माहिती एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाकडून दिली आहे.
१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने, राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत, तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून, राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेड्स उपलब्ध आहेत.
३५३ प्रवाशांचा पाठपुरावा पूर्ण
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशांतील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन, त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे, तर १२ मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित असणाºया देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरूपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला असल्याची माहिती टोपे यांनी दिली.