प्राण्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना नाही - उद्धव ठाकरे
By संजय घावरे | Published: November 21, 2023 08:37 PM2023-11-21T20:37:47+5:302023-11-21T20:38:04+5:30
डॉ. रमाकांत पांडा यांच्या 'हार्टबिट्स' चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन; वन्यजीव संवर्धनासाठी दान करणार रक्कम
मुंबई - आज आपण विकासाच्या नावाखाली जंगल संपवत आहोत. प्राण्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना नाही. आपण सर्व निसर्गाच्या विरोधात वागत असताना रमाकांत पांडांसारखे डॉक्टर प्राणी व पक्ष्यांचे अनोखे विश्व जगासमोर आणत असल्याचा आनंद आहे. या विश्वात मलाही तुमच्यासोबत घेऊन चला असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. डॉ. रमाकांत पांडा यांच्या 'हार्टबिट्स' या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ठाकरे बोलत होते.
जगातील आघाडीचे कार्डियाक सर्जन आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, मुंबईचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पांडा यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरले आहे. एशियन वाईल्डलाइफ ट्रस्टच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रश्मी ठाकरे, माजी आमदार सुरेश शेट्टी, जहांगीर आर्ट गॅलरीच्या सचिव के जी मेनन, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, कॉर्पोरेट अफेअर्स ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नथवानी, जहांगीर आर्ट गॅलरीचे संचालक जहांगीर उपस्थित होते.
हे प्रदर्शन २७ नोव्हेंबरपर्यंत कलाप्रेमींसाठी सुरू राहणार आहे. वन्यजीव संरक्षणाच्या थीमवर आधारलेले हे प्रदर्शन म्हणजे जणू मंत्रमुग्ध करणाऱ्या अनोख्या १३० छायाचित्रांचा एक आकर्षक संग्रहच आहे. या प्रदर्शनातून जमा होणारी संपूर्ण रक्कम वन्यजीव संवर्धनासाठी दान करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य, पेंच, बांधवगड, सातपुडा, भरतपूर, चिल्का, केनिया आदी बऱ्याच ठिकाणी पांडा यांनी प्रचंड मेहनतीने ही छायाचित्रे काढली अहेत.
डॉक्टर पांडा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडून फोटोग्राफीसाठी प्रेरणा मिळाली. हे विश्व खूपच अदभूत असून, मागील पाच-सात वर्षांपासून मला खुणावत आले आहे. बिझी वेळापत्रकातून वेळ काढून सकाळी ६ वाजता कर्नाळा अभयारण्यात पोहोचायचो. तिथे सकाळी ८ वाजेपर्यंत फोटो काढायचो आणि ९ वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचून पेशन्ट्स तपासायचो. अशा प्रकारे फोटोग्राफीची आवड जोपासली असल्याचेही पांडा म्हणाले.
माझ्याकडून प्रेरणा घेतलेला एक तरी माणूस सापडला अशी कोपरखळी मारत उद्धव ठाकरे म्हणाले की, फॉरेस्ट गार्ड नसतील तर जंगलांचे काही खरे नाही. फोटोग्राफी बघण्यापेक्षा करण्यात मजा आहे. शहरात काही राहिलेले नाही. खरे जीवन जंगलात आहे. पांडा हे हृदयाचे डॉक्टर असूनही फोटोग्राफीचा छंद जोपासत आहेत. आपल्यातील आवड जोपासली तरच आपण आंनदी राहू शकतो. पांडा यांनी कॅमेऱ्यात टिपलेले हत्तीचे हे रूप निराळे आणि आकर्षित करणारे असल्याचेही ते म्हणाले.