ना पूर्व परीक्षा, ना सरावासाठी प्रश्नपत्रिका; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 07:23 AM2022-01-14T07:23:43+5:302022-01-14T07:24:00+5:30
दहावी- बारावीच्या परीक्षा या ऑफलाइन म्हणजेच प्रचलित पद्धतीने नियमित वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून स्पष्ट केले आहे.
मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा महिन्यावर आलेल्या असताना शाळा बंदीमुळे अनेक शाळांना विद्यार्थ्यांच्या पूर्व परीक्षा, सराव परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. २५ टक्के कपात झालेल्या अभ्यासक्रमावर मंडळाकडून विषयनिहाय अभ्यासक्रम दिला असला, तरी विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा झाल्या नसल्याने त्यांना घाम फुटला आहे. यंदा विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रश्नसंच काढले गेले नसले, तरी मागील वर्षीच्या संकेतस्थळावरील प्रश्नपेढीचा आधार घेऊन विद्यार्थी सराव करू शकणार असल्याची माहिती एससीईआरटीकडून देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या प्रश्नपेढीचा आधार घेऊन लेखी परीक्षांचा सराव करता येणार आहे.
दहावी- बारावीच्या परीक्षा या ऑफलाइन म्हणजेच प्रचलित पद्धतीने नियमित वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून स्पष्ट केले आहे. मात्र, त्याआधीच राज्यात सरसकट शाळा बंदीचा निर्णय घेण्यात आल्याने अनेक शाळांकडून नियोजित पूर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. अनेक शाळा या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेत आहेत. मात्र, त्यांचा काहीच उपयोग होणार असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षांची धास्ती वाढत असल्याचे समोर येत आहे.
शाळा व्यवस्थापनाला दहावी- बारावीसाठी आवश्यक ते उपक्रम राबविण्याची मुभा दिली आहे.तो अधिकार शाळा आणि मुख्याध्यापकांना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दृष्टीने शाळा पूर्व परीक्षा आणि सराव परीक्षा आयोजित करू शकतात, असे मत राज्य मुख्याध्यापक महासंघाचे महेंद्र गणपुले यांनी मांडले आहे. विद्यार्थ्यांनी २५ टक्के अभ्यासक्रम कपातीनंतर जो अभ्यासक्रम आवश्यक आहे त्याचा सराव परीक्षेच्या दृष्टीने करीत राहावा, असे आवाहन गणपुले यांनी केले आहे.
समन्वय नसल्याची टीका
मागील वर्षी विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा झाल्या नाहीत, विद्यार्थी जवळपास वर्षभर शाळेतही प्रत्यक्ष शिक्षण घेऊ शकले नाहीत, अशा परिस्थितीत शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नसंच किंवा सराव प्रश्नपत्रिका पुरविणे आवश्यक असल्याची मागणी विद्यार्थी पालकांमधून होत आहे. एससीईआरटी आणि मंडळामध्ये नसलेल्या समन्वयामुळे ते विद्यार्थ्यांना आवश्यक प्रश्नसंच पुरवू शकले नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मात्र, मागील वर्षी एससीईआरटीकडून पुरविण्यात आलेल्या प्रश्नपेढीचा वापर विद्यार्थी यंदाही करू शकणार असल्याचे मत विभागातील अधिकाऱ्यांनी मांडले आहे.