मुंबई : दाऊद इब्राहिमची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही. अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्वत:वरील आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी दिला आहे.
सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदू संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी. दाऊदच्या ज्या जमिनीचा उल्लेख मलिक करत आहेत, ती जमीन केंद्र सरकारने जप्त करून लिलाव केलेली आहे.
दिल्लीतील ॲड. अजय श्रीवास्तव यांनी ती खरेदी केली. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी सनातन धर्म पाठशाळा नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही. असत्य माहितीच्या आधारे स्वत:ची लंगडी बाजू सावरण्याचा मलिक यांचा प्रयत्न उघडा पडला आहे. सनातन संस्थेविषयी असत्य माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास नाइलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही सनातनने दिला.