Join us

रेल्वेपूल नव्हे, प्रेमीयुगुल पॉइंट

By admin | Published: November 20, 2014 1:22 AM

खांदा कॉलनीमध्ये रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी उभारलेला रेल्वे पुलांवर मद्यपी, प्रेमीयुगुलांचा मिटींग पॉइंट बनला आहे.

नवी मुंबई : खांदा कॉलनीमध्ये रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी उभारलेला रेल्वे पुलांवर मद्यपी, प्रेमीयुगुलांचा मिटींग पॉइंट बनला आहे. मद्यपींचा धिंगाणा आणि प्रेमिकांच्या अश्लील चाळ्यांनी सामान्यांमध्ये त्रास होत असून पुलावरून जाण्याऐवजी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडण्याची जोखीम पत्कारावी लागत आहे. पनवेलमधील खांदा कॉलनी परिसरात सायन-पनवेल मार्गालगत खांदा गावाजवळ यापैकी एक उड्डाणपूल आहे. पनवेलच्या दिशेने सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या या पुलाखालून जातात. रस्ता ओलांडताना याठिकाणच्या रहिवाशांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सिडकोच्या मार्फत याठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. खांदा गावात जाण्यासाठी या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र त्या पुलाचा वापर वाटसरूंना होत नसून परिसरातील प्रेमीयुगुल व मद्यपी यांच्यासाठी होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. अशीच अवस्था खांदा कॉलनीमधील नवीन पनवेल शहराला जोडणाऱ्या पुलावर आहे. पनवेल - दिवा पॅसेंजर याठिकाणाहून जाते. सायंकाळ होताच मद्यपी, प्रेमीयुगुले या पुलावर कब्जा करतात. त्यामुळे याठिकाणी दारूच्या बाटल्या, पिशव्या पडलेल्या असतात. विशेषत: महिलांना याठिकाणाहून जाताना त्रास होतो. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत चालली असून पोलिसांनी विशेष मोहीम राबवून यासंदर्भात सक्त कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया किशोर सापते या रहिवाशाने दिली. यासंदर्भात अनेक तक्रारी आपण स्वत: केल्या असून पोलीस आले की मद्यपी याठिकाणाहून पसार होतात मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थेच निर्माण होते असे स्थानिक नगरसेविका सीताताई पाटील यांनी सांगितले. या परिसरालगतच्या महिलांना याचा जास्तीत जास्त त्रास होतो, त्यामुळे हा प्रकार थांबायला हवा अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात माहिती घेऊन कारवाई करून असे खांदेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. आर. थोरात यांनी सांगितले. (प्रतिनिधी)