येरे येरे पावसा; मुंबईसह राज्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:03 AM2019-08-28T01:03:12+5:302019-08-28T01:03:16+5:30

गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागात मध्यम पावसाची नोंद झाली.

no rain in state with Mumbai | येरे येरे पावसा; मुंबईसह राज्याकडे पाठ

येरे येरे पावसा; मुंबईसह राज्याकडे पाठ

Next

मुंबई : गेल्या २४ तासांपासून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित भागांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ही स्थिती २८ आॅगस्टपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, २९ आॅगस्टपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असून, राज्यात मध्यम ते जोरदार; तर मुंबई आणि पुण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.


स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागात मध्यम पावसाची नोंद झाली. उत्तर मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात मुसळधार सरींसह हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. कोकण आणि गोव्यात पाऊस विखुरलेला स्वरूपात नोंदविण्यात आला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली.
दरम्यान, २८ आॅगस्टपर्यंत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण, गोव्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात नोंदविण्यात येईल. तथापि, राज्याच्या इतर भागांत पावसाचे प्रमाण कमी राहील.

ढग दाटून येत असले तरी दिवस जातोय कोरडाच
मुंबई शहर आणि उपनगरांत ढग दाटून येत असले, तरी पावसाने पाठ फिरविली आहे. काही मिनिटे जोरदार कोसळणारा पाऊस वगळला तर संपूर्ण दिवस कोरडाच जात आहे. दरम्यान, रविवारी सकाळी १५ मिनिटे, सोमवारी मध्यरात्री कोसळलेल्या जोरदार सरी, मंगळवारी पहाटे नोंदविण्यात आलेल्या कोसळधारा आणि मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास १५ मिनिटे कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडविली होती.

२९ आॅगस्टला पुनरागमन
२९ आॅगस्टच्या सुमारास मान्सून पुनरागमन करेल. कोकण आणि गोव्यात जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या काळात मुंबईतही पाऊस वाढेल. किंचित स्वरूपात मुसळधार सरींची शक्यता आहे.
कमी दाबाचे क्षेत्र
२९ ते ३१ आॅगस्टदरम्यान पुणे शहरात मध्यम सरींसह हलका पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर विदर्भाच्या पूर्व जिल्ह्यांमध्ये काही मध्यम सरींची शक्यता आहे.
तुरळक ठिकाणी नोंदी
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली.

राज्यासाठी अंदाज
२८ आॅगस्ट : कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
२९ आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
३० आॅगस्ट : कोकण, गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
३१ आॅगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
मुंबई अंदाज
बुधवारसह गुरुवारी शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.

Web Title: no rain in state with Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.