बलात्कार झाला नाही ना... फक्त पैसेच गेले ना! वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 02:54 AM2018-06-06T02:54:33+5:302018-06-06T02:54:33+5:30

‘तू खरंच नशीबवान आहेस. आरोपीने तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. बलात्कार झाला नाही. फक्त पैसेच गेले आहेत ना. त्यामुळे त्याला विसर आता आणि आयुष्यात पुढे हो,’ असा अजब सल्ला मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ निरीक्षकाने एका तरुणीला दिला आहे.

No rape has happened ... only money has gone! Statement of senior police inspector | बलात्कार झाला नाही ना... फक्त पैसेच गेले ना! वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे वक्तव्य

बलात्कार झाला नाही ना... फक्त पैसेच गेले ना! वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे वक्तव्य

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : ‘तू खरंच नशीबवान आहेस. आरोपीने तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. बलात्कार झाला नाही. फक्त पैसेच गेले आहेत ना. त्यामुळे त्याला विसर आता आणि आयुष्यात पुढे हो,’ असा अजब सल्ला मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ निरीक्षकाने एका तरुणीला दिला आहे. दोन वर्षे उलटूनही चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर तरुणीने पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.
चारकोप परिसरात कुटुंबासह राहणारी ३५ वर्षीय रेश्मा (नावात बदल) उच्च न्यायालयात वकिलीची पॅ्रक्टिस करते. वय उलटून जात असल्याने आई-वडील, नातेवाईक तिच्या लग्नासाठी स्थळ शोधत होते. अशातच २२ मार्च २०१६ रोजी विवाह संकेतस्थळावरून तिला संपत कुमार नावाने रिक्वेस्ट आली.
अमेरिकेतील शेल आॅईल कंपनीत इंजिनीअर असल्याचे त्याने प्रोफाइलमध्ये नमूद केले होते. त्याने अपलोड केलेला फोटो आणि दिलेल्या माहितीवरून त्याचे उच्च राहणीमान दिसत होते. काही दिवसांतच दोघांमध्ये संवाद सुरू झाला. संवादाचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे प्रेमात. रेश्मा जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच, संपतने तिच्याकडून पैसे काढण्यास सुरुवात केली. ३० एप्रिल रोजी नेपाळला जात असताना रेल्वेत पाकीट विसरलो. त्यामुळे स्थानिक पोलिसाने पकडले असून सोडण्यासाठी २५ हजारांची मागणी केल्याचा बनाव करत पहिल्यांदा त्याने तिच्याकडून पैसे उकळले. रेश्मानेही तत्काळ त्याला पैसे पाठवले. सावज जाळ्यात आल्याची खात्री पटल्याने संपतने कधी स्वत:चा, तर कधीचा आईचा अपघात झाला, रुग्णालयात खर्चासाठी पैसे नाहीत, पोलिसांनी पकडले, कस्टम अधिकाऱ्याने पकडले, आरबीआय बँकेतून पैसे मागत आहेत, अशी अनेक कारणे सांगत तिच्याकडून चार महिन्यांत तब्बल २५ लाख उकळले.
त्यानंतर बनाव उघडा पडण्याच्या आधीच संपतने तिच्याशी संपर्क तोडला. याचा रेश्माला मानसिक धक्का बसला. ती काही दिवस ट्रॉमामध्ये होती. यातून स्वत:ला कसेबसे सावरत तिने २७ आॅगस्ट २०१६ रोजी पोलिसांत धाव घेतली.
सायबर पोलिसांकडून हे प्रकरण तपासासाठी चारकोप पोलिसांकडे आले. तेथील तपास अधिकारी पीएसआय तोंडे यांच्याकडे तिने संपतविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र त्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप रेश्माने केला आहे. पुढे तिने तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या एका उत्तरामुळे ती आणखीनच खचली. ‘तू खरंच नशीबवान आहेस. आरोपीने तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. तुझ्यावर बलात्कार झाला नाही. फक्त पैसेच गेले आहेत ना. त्यामुळे त्याला विसर आता आणि आयुष्यात पुढे हो,’ असा अजब सल्ला देऊन ते मोकळे झाल्याचेही रेश्माचे म्हणणे आहे.
त्यानंतर पोलिसांवरचाही तिचा विश्वास हळूहळू उडू लागला. आजही संपत कुमारचे मित्र तिला मानसिक त्रास देत आहेत. मात्र याची दखल घेण्यास पोलिसांना वेळ नसल्याचा आरोप तिने केला आहे.

मॅडम दोन वर्षांपासून ‘बिझी’ : तपास अधिकारी पीएसआय तोंडे यांना रेश्मा नेहमी कॉल करते. मात्र कॉल घेणे तर दूरच, त्यांच्याकडून नेहमी, ‘सॉरी, आय एम बिझी नाऊ ’ असे ऐकायला मिळते. दोन वर्षे उलटत आली तरी मॅडम व्यस्त असल्याचे रेश्माचे म्हणणे आहे. या प्रकरणी तोंडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

तक्रारदारच आठवत नाही...
मी असे कुणालाही बोललेलो नाही. सध्या मला तक्रारदारच आठवत नाही. आम्ही नेहमी प्रत्येक तक्रारीची दखल घेतो, असे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

आयुक्तांकडे धाव
दोन वर्षे उलटूनही पोलीस तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने ३१ मे रोजी तिने पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे धाव घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Web Title: No rape has happened ... only money has gone! Statement of senior police inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.