Join us

नोंदणी नाही, तर वर्गणीचा अधिकार नाही - धर्मादाय आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 3:56 AM

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी धर्मादाय आयुक्तालयात गणेशोत्सव समन्वय समितीच्या सदस्यांची धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक पार पडली. या वेळी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर आणि सदस्य उपस्थित होते.

मुंबई : धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणी असलेल्या संस्थांनाच केवळ वर्गणी गोळा करण्याचा अधिकार आहे. नोंदणी नसलेल्या संस्था किंवा मंडळांनी वर्गणी गोळा केल्यास धर्मादाय आयुक्तालयाकडून त्यांच्यावर दंड आणि कठोर शिक्षेची कारवाई करण्यात येईल, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला धर्मादाय आयुक्त संजय मेहरे यांनी सुनावले.आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी धर्मादाय आयुक्तालयात गणेशोत्सव समन्वय समितीच्या सदस्यांची धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक पार पडली. या वेळी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर आणि सदस्य उपस्थित होते.धर्मादाय आयुक्त संजय मेहरे यांनी या वेळी सांगितले की, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांविषयीच्या नियमांची उजळणी केली. यात मुख्यत: नोंदणीकृत नसलेल्या मंडळ, संस्थांनी वर्गणी जमा केल्यास त्यांना तीन महिने तुरुंगवास आणि जमा केलेल्या रकमेच्या दीडपट दंड आकारणीला सामोरे जावे लागणार आहे. नोंदणी नसलेल्या कोणत्याही संस्था वा मंडळाला वर्गणी जमा करायची असल्यास त्याकरिता धर्मादाय आयुक्तालयाची परवानगी बंधनकारक आहे.यासाठीचा अर्ज आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर असून त्याची वैधता सहा महिन्यांपुरतीच असेल. त्यानंतर संबंधित मंडळ वा संस्थेने जमा-खर्च सादर करून शिल्लक रक्कम धर्मादाय आयुक्तालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे जास्तीतजास्त मंडळांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, कोणत्याही गणेशोत्सव मंडळाने मदत केल्यास त्याविषयी आयुक्तालयाला कळवावे, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या संस्था, संघटना आणि मंडळांनी त्वरित धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी करावी. जेणेकरून उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.- अ‍ॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीपूरग्रस्तांना देण्यात येणाºया मदत प्रक्रियेतील पारदर्शकता टिकविण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मदत करावी. ज्या संस्था, संघटना, समूह, प्रतिष्ठाने, मंडळे पूरग्रस्तांना मदत करतील त्यांनी धर्मादाय आयुक्तालयात सूचित करावे.- संजय मेहरे, धर्मादाय आयुक्त

टॅग्स :मुंबई