लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपात वकिलांचा गणवेश घालून भाषण दिल्याने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्यास सांगितले. तसेच सुनावणीदरम्यान न्यायालयाने सदावर्ते दाम्पत्याला शिस्त पाळण्याची वारंवार समज दिली.
बार काउन्सिलने शिस्तभंगाची कारवाईचा भाग म्हणून सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी निलंबित केली. त्याविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. राजकीय सुडापोटी आपल्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे सदावर्ते यांनी न्यायालयाला सांगितले. हे सांगताना त्यांची भाषा आक्रमक होती. त्यामुळे न्यायालयाने ‘तुम्ही प्रेससमोर नसून न्यायालयात आहात, याचे भान राखा’, अशा शब्दांत सदावर्ते यांना समज दिली.