Join us

ममता बॅनर्जींना दिलासा नाही; राष्ट्रगीत अवमानप्रकरणी गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 7:27 AM

गुन्हा रद्द न करता तक्रारीवर नव्याने सुनावणी करण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय योग्य आहे.

मुंबई : राष्ट्रगीत अवमानप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची याचिका फेटाळली.

गुन्हा रद्द न करता तक्रारीवर नव्याने सुनावणी करण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे म्हणत न्या. अमित बोरकर यांच्या एकलपीठाने बॅनर्जी यांची याचिका फेटाळली. राष्ट्रगीताचा अनादर केल्याप्रकरणी भाजपचे मुंबईचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार केली. फेब्रुवारी २०२२ मध्ये दंडाधिकाऱ्यांनी बॅनर्जी यांना समन्स बजावले. समन्स रद्द करण्याची विनंतीही बॅनर्जी यांनी न्यायालयाला केली होती. 

प्रकरण काय?

१ डिसेंबर २०२१ रोजी बॅनर्जी यशवंतराव चव्हाण सभागृहात एक कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. राष्ट्रगीत सुरू असतानाच त्या तिथून निघून गेल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. जानेवारी २०२२ मध्ये सत्र न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करत तक्रारीवर पुन्हा सुनावणी घेण्याची सूचना केली होती.

 

टॅग्स :ममता बॅनर्जी