संजय राऊत यांना कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर २१ ला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 05:50 AM2022-10-19T05:50:44+5:302022-10-19T05:51:12+5:30
राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ.
मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवत विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ केली आहे. मंगळवारी राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी विशेष पीएमएलए न्यायालयाला सांगितले की, ईडीने राऊत यांच्यावर केलेले आरोप अविश्वसनीय असून, त्यावर अवलंबून राहू शकत नाही.
‘कथित व्यवहार २००८ ते २०१२ दरम्यानचे आहेत. एक दशक उलटले आहे आणि आरोप फक्त ३.८५ कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहाराचा आहे,’ असा युक्तिवाद मुंदरगी यांनी केला. मुंदरगी यांनी केलेल्या नव्या युक्तिवादावर उत्तर देण्यासाठी अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांनी न्यायालयाकडून मुदत मागितली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली.
चिंता करू नका
जामीन अर्जावरील सुनावणीत राऊत विशेष न्यायालयात हजर होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपस्थित होते. राऊत व खडसे यांची भेट सत्र न्यायालयाच्या लिफ्टजवळ झाली. यावेळी खडसे यांनी राऊत यांची चौकशी केली. त्यावर राऊत यांनी चिंता करू नका, असे खडसेंना सांगितले.
ओके है सब
‘संजय राऊत म्हणाले, ओके है सब, काही चिंता करू का, आताच बाहेर येणार आहे म्हणे मी,’ असे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले. खोक्यांसंदर्भात काही बोलले का? अशी विचारणा एका पत्रकाराने केल्यावर खडसे मिश्कीलपणे म्हणाले की, खोके नाही, ओके आहे बोलले. राऊत यांची लिफ्टजवळ भेट झाली. दोन मिनिटे ते बोलले, सब कुछ ओके है, असे खडसेंनी सांगितले.