Join us

इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ; मुंबईत पेट्रोलचा दर 89.80 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 7:20 AM

डिझेलच्या दरात आज कोणतीही वाढ नाही

मुंबई: देशभरात आजही पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 11 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 89.80 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे डिझेलचा दर 78.42 रुपयांवर स्थिर आहे. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. मुंबईकरांसोबतच दिल्लीकरांनादेखील पेट्रोल दरवाढीची झळ बसणार आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 12 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 82.44 रुपये मोजावे लागतील. मुंबईसोबतच दिल्लीतही डिझेलचे दर वाढलेले नाहीत. दिल्लीत डिझेलचा दर 73.87 रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र त्याआधीच्या 13 दिवसांमध्ये डिझेलच्या दरात जवळपास दीड रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. पेट्रोल-डिझेल वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे. याविरोधात 10 सप्टेंबरला काँग्रेसनं भारत बंदची हाक दिली होती. या बंदला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत देशवासीयांना इंधन दरवाढीमुळे होणाऱ्या त्रासाची सरकारला कल्पना असल्याचं म्हटलं होतं. मात्र इंधनाच्या दरात कपात करण्यास त्यांनी असमर्थतता दर्शवली. इंधनाचे दर सरकारच्या आमच्या हातात नाहीत, असं म्हणत त्यांनी हात वर केले होते. 

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल