पी उत्तरच्या सहाय्यक आयुक्तांची कारवाई
गौरी टेंबकर - कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाडच्या पी उत्तर विभागात मोडणाऱ्या मढ, मनोरी आणि मार्वे परिसरात अनधिकृतपणे तयार करण्यात आलेल्या ‘ग्राऊंड प्लस थ्री’च्या बांधकामांवर बुधवारी पालिकेने हातोडा फिरवला आहे. वर्सोव्यात जिल्हाधिकारी जमिनीवर २०० इमारती बांधल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केले होते. त्याची पुनरावृत्ती मालाडमध्ये होऊ नये, यासाठी ही धडक कारवाई सुरू करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्तांचे म्हणणे आहे.
मढ, मार्वे आणि मनोरी परिसरात असलेल्या ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये हे बांधकाम करण्यात आले आहे. कोळी समाज राहात असलेल्या या परिसरात तीन ते चार मजले तयार करण्यात आले होते. त्यानुसार पी उत्तरचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. ज्याला काही समाजसेवी संस्थांनी विरोध केला आहे. काही विकासक कोळी बांधवांना बाहेर काढून त्याठिकाणी पुनर्विकास योजना राबविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याला नकार दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
याच पी उत्तर परिसरात स्थानिक कंत्राटदार व भूमाफिया यांच्या आशीर्वादाने मोठमोठी बांधकामे पी उत्तरमधील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उभी असून, त्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, गरीब कोळी समाजावर हा अत्याचार करणाऱ्या दगडखैर यांची तातडीने बदली केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘लोकमत’नेही ‘वर्सोव्यात जिल्हाधिकारी जमिनीवर २०० अनधिकृत इमारती’ या मथळ्याखाली ११ ऑगस्ट २०२१ रोजी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर के/पश्चिम वार्डने या इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
बदलीची पर्वा मला नाही !
‘कोळी समाज २०० वर्षे वास्तव्यास असल्याने त्यांचे राहते घर त्यांनी नीट बांधले, हे आम्ही समजू शकतो. मात्र वर्सोव्यात जशी परिस्थिती सध्या आहे त्याचप्रमाणे मार्वे, मढ तसेच मनोरीत पालिका इमारत प्रस्ताव किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही परवानगी न घेता या राहत्या घरावर अनधिकृतपणे दोन ते तीन मजले चढवत त्यांची लाखो रुपयांना विक्री केली जात आहे. त्यानुसार आम्ही याप्रकरणी पोलिसात दखलपात्र गुन्हा दाखल करत ही कारवाई केली असून, त्यासाठी माझी बदली झाल्यास मला त्याची पर्वा नाही.’
- मकरंद दगडखैर - सहाय्यक आयुक्त, पी /उत्तर
फोटो : मढ, मनोरी आणि मार्वेच्या ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये अशाप्रकारे अनधिकृत घरे बांधली आहेत.